Sun, Aug 09, 2020 04:40होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दगडफेकीत ४० पोलिसांसह ८६ जखमी

औरंगाबाद : दगडफेकीत ४० पोलिसांसह ८६ जखमी

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 04 2018 12:37AM

बुकमार्क करा
औरंगाबाद ः प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा प्रकरणाचे शहरात सलग तिसर्‍या दिवशी पडसाद उमटले. बुधवारी अनेक ठिकाणी झालेल्या दगडफेकीत 40 पेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांसह एकूण 86 जण जखमी झाले. हे सर्व जण घाटीत उपचारासाठी दाखल झाले होते. सर्वाधिक पोलिस हे आंबेडकरनगर भागात झालेल्या दगडफेकीत जखमी झाले. 

कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेवरून पेटलेले वातावरण अद्यापही शांत होण्यास तयार नाही. बुधवारी विविध पक्ष-संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या काळात सकाळी आंबेडकरनगरातील गल्लीबोळांमधून अनेक जमाव रस्त्यावर उतरले. या जमावाने रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या वाहनांवर तुफान दगडफेक सुरू केली. काही वेळातच पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे पोहचला. तेव्हा जमावाने या पोलिसांवरही तुफान दगडफेक केली. त्यात सहायक पोलिस आयुक्‍त नागनाथ कोडे, सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांच्यासह सुमारे 25 पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. या शिवाय मिसारवाडी परिसरातही पोलिस पथकावर दगडफेक झाली. त्यातही अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. जखमींमध्ये फौजदार किशोर विश्‍वनाथ बिंड, अमोल देशमुख, सहायक फौजदार रामदास गाडेकर, बाळू खडसन, किरण शिरसाट, सुनील रमंडवाल, गणेश बकूल, सुरेश नवले, धनंजय गिते, शिवाजी बैनाडे, अशोक शेळके, जयसिंग चव्हाण, विनोद परदेशी यांच्यासह 40 पेक्षा अधिक पोलिसांचा समावेश आहे. 

दगडफेकीच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या लाठीमारातही 40 पेक्षा अधिक महिला, तरुण जखमी झाले. त्यांच्यावरही घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. किरकोळ जखमी स्वतःहून पोलिसांची परवानगी घेऊन प्राथमिक उपचार घेऊन जात होते. तर ज्यांचे डोके, हात, पाय आदींना गंभीर जखमा झाल्या, त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात येत होते. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जखमी पोलिसांची संख्या अधिक दिसून आली. अनेक जखमींना सायंकाळी उशिरापर्यंत घाटीत आणण्यात येत होते. एक पोलिस अधिकारी येणार्‍या सर्व जखमींची नोंद करून त्यांच्यावर उपचार करून घेत होते.