Mon, Nov 30, 2020 13:00होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत जमावबंदी दगडफेक, तोडफोड, जाळपोळीच्या घटनांमुळे शहरात तणाव

औरंगाबादेत जमावबंदी दगडफेक, तोडफोड, जाळपोळीच्या घटनांमुळे शहरात तणाव

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 1:03AM

बुकमार्क करा
औरंगाबाद :  प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ औरंगाबादेत संतप्त जमावाने मंगळवारी (दि. 2) तुफान दगडफेक केली. विविध ठिकाणी शासकीय तसेच खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. काही ठिकाणी जमाव आणि पोलिसांत जोरदार धुमश्‍चक्री झाली. दरम्यान, प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केला असून तब्बल तीन हजार पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

आमखास मैदानाजवळ मंगळवारी सकाळी 7 वाजता बस फोडण्यात आली. जमावाला रस्त्यावर उतरण्यास एवढी एक घटना पुरेशी झाली. त्यानंतर टीव्ही सेंटर भागातील  सिद्धार्थनगर, आंबेडकर नगर, उस्मानपुर्‍यातील कामगार चौक, जालना रोडवरील रमानगर, क्रांतीनगर, क्रांती चौक आदी ठिकाणी जमावाने रस्त्यावर येऊन दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना सर्वच ठिकाणी बळाचा वापर करावा लागला. 

मंगळवारी सकाळी शहरात संतप्त जमावाने केलेल्या तुफान दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले. यातील तिघांना जबर मार लागला असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. अर्जुन चव्हाण, श्याम गायकवाड आणि जोतिबा  गाडगे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. याशिवाय सिद्धार्थ थोरात यांच्या गालावरही जखम झाली आहे. सिद्धार्थनगरमध्ये व्हिडिओ शूटिंग करणार्‍या चव्हाण यांच्या डोळ्याजवळ, तर जमावाला शांततेचे आवाहन करताना श्याम गायकवाड यांना डोक्यात दगड लागला. जोतिबा गाडगे यांच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यांना चालताही येत नव्हते. अनेक पोलिसांना दगड लागले आहेत. 

शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी फौजदारी दंडसंहिता सन 1973 चे कलम 144 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश लागू केला. त्यानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन पोलिस करीत होते. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही पोलिस वारंवार सांगत होते. 

रिअ‍ॅक्शन न देण्याच्या सूचना शहरात विविध प्रकारच्या अफवा पसरवून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे लक्षात आले असून इतर पक्षांच्या नेत्यांचीही बैठक घेण्यात आली आहे. त्यांना रिअ‍ॅक्शन न देण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सर्वच ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले असून, त्यात दोषी आढळणार्‍यांवर गुन्हे नोंद केले जातील, असे प्रभारी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. 

तरुणांच्या भावना तीव्र होत्या. त्यांचा उद्रेक पाहता पोलिसांनी संयमाने जमाव शांत केला. ध्वनिक्षेपकावरून वारंवार शांततेचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर काही ठिकाणी लाठीचार्ज तर काही ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्यात आले. तसेच, शहरात प्रमुख दलित नेत्यांची बैठक घेण्यात आली. त्यांना कार्यकर्त्यांना शांत ठेवण्याचे बजावण्यात आले आहे. कुठलीही अफवा पसरवू देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत.