Mon, Nov 30, 2020 13:52होमपेज › Aurangabad › एमबीएचा ‘तो’ पेपर दोन परीक्षा केंद्रांवरून फुटला?

एमबीएचा ‘तो’ पेपर दोन परीक्षा केंद्रांवरून फुटला?

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 1:07AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी 

एमबीएच्या ‘अकाउंटिंग फॉर मॅनेजर’ या पेपरला वसंतराव नाईक महाविद्यालयासह आणखी एका परीक्षा केंद्रातून पाय फुटले होते, अशी खळबळजनक चर्चा आहे. प्रथम वर्षाचा हा पेपर सोमवारी फुटला होता. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर दोन-तीन ग्रुप सदस्यांत त्याबाबत झालेली चॅटिंग व पेपरच्या पानांवरील कोडमधील तफावत यामुळे तो दोन ठिकाणांहून फुटल्याच्या चर्चेला बळकटी मिळत असून यामागे मोठे रॅकेट असल्याची शंका व्यक्‍त होत आहे. 

प्रथम वर्षाचा हा पेपर वसंतराव नाईक महाविद्यालयातून सोमवारी फुटला होता. याप्रकरणी परीक्षार्थीसह तीन जणांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. शेख अजमद कलीम याने मोबाइलवर पेपरचा फोटो काढून फ्यूचर मॅनेजर या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला होता. हा पेपर तीन पानी होता. ग्रुपवर तिन्ही पाने होती. तथापि, दोन पाने अजमदच्या क्रमांकावरून तर तिसरे शेवटचे पान जाधव नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकावरून पडले होते, असे समजते. पेपरच्या सर्व पानांवर सुरक्षा संकेतांक (सेक्युरिटी कोड) असतो. हा संकेतांक परीक्षा केंद्रनिहाय असल्यामुळे प्रत्येक केंद्राच्या पेपरवर तो वेगळा असतो. अजमदच्या क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर पडलेल्या दोन पानांचा क्रमांक एकच असून जाधव नावाच्या क्रमांकावरून आलेल्या तिसर्‍या पानाचा संकेतांक वेगळा आहे. त्यामुळे दोन पाने वसंतराव नाईक महाविद्यालयातून तर तिसरे पान दुसर्‍या परीक्षा केंद्रावरून फुटल्याचे दिसते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजमदने दोन पाने पाठविल्यानंतर पिछली साईड कौन भेजेगा आणि अबे तिसरा पेज भेज ना जल्दी अशी चॅटिंग असून त्यानंतर काही मिनिटांतच जाधव नावाच्या क्रमांकावरून तिसरे पान पडले. पहिल्या दोन पानांचा डी836डी तर तिसर्‍या पानाचा बी3ईएफसी असा सुरक्षा संकेतांक असल्याचे सांगण्यात येते.