Wed, Oct 28, 2020 11:34होमपेज › Aurangabad › बळीराजावर आता सुलतानी संकट

बळीराजावर आता सुलतानी संकट

Published On: Dec 06 2017 1:58AM | Last Updated: Dec 06 2017 1:54AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

आधीच निसर्गाच्या अवकृपेने हैराण असलेल्या बळीराजावर आता महावितरणमुळे सुलतानी संकट ओढावले आहे. थकबाकीच्या नावाखाली महावितरणने धडाधड कृषिपंपांची वीज तोडण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे महावितरण केवळ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याऐवजी डीपीचाच पुरवठा खंडित करीत आहे. त्यामुळे बिल भरणार्‍यांचेही हाल होत आहेत. अशा प्रकारे महावितरणने आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल 50 हजार कृषिपंपांचा वीज पुरवठा कापला आहे. या कारवाईमुळे शेतकर्‍यांमध्ये महावितरणबाबत असंतोष खदखदत आहे.  

यंदा निसर्गाच्या अवकृपेने बर्‍याच शेतकर्‍यांचे खरीप हातचे गेले. त्यातच कशाबशा जगविलेल्या कपाशीने बाळसं धरताचे बोंडअळीने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले. त्यामुळे खरिपाच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. खरीप गेल्यानंतर रब्बीच्या आशेवर शेतकरी होता. आता रब्बीचे पीक ऐन बहरात आलेले असताना अन् त्याला पाणी देण्याची गरज असतानाच महावितरणने थकबाकीच्या नावाखाली कृषिपंपांची वीज कापण्यास सुरुवात केली आहे. 

दोन लाख ग्राहकांकडे 180 कोटींची थकबाकी 

औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक लाख 93 हजार 228, तर शहरात 1540 कृषिपंपधारक आहेत. यांच्याकडे एकूण 210 कोटी 89 लाख थकबाकी होती. त्यापैकी 30 हजार शेतकर्‍यांनी 29 कोटी 32 लाख रुपयांचा भरणा केला आहे. म्हणजेच जिल्ह्यात आज 180 कोटी रुपये कृषिपंपधारकांकडे थकलेले आहेत. यापैकी 50 हजार 413  कृषिपंपांचा महावितरणने आजही वीज पुरवठा खंडित केला आहे. उरलेल्या पंपधारकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले. 

शहरी भागातील अवघ्या 47 हजार ग्राहकांकडे 230 कोटी थकबाकी

एकीकडे लाखो शेतकर्‍यांकडे 180 कोटी रुपयांची थकबाकी आहे, म्हणून महावितरण त्यांना ऐन गरजेच्या वेळी शॉक देत आहे. तर दुसरीकडे शहरी भागातील घरगुती, व्यापारी, औद्योगिक वापराचे मीटर असलेल्या अवघ्या 47736 ग्राहकांकडे तब्बल 230 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातही अवघ्या 2741 बड्या म्हणजेच एक लाखापेक्षा अधिक बिल असलेल्या  ग्राहकांकडे तब्बल 80 कोटींची थकबाकी आहे. त्यांच्यावर मात्र, कारवाई झालेली नाही, हे विशेष. यावरून महावितरण शहरी भागाला सोडून आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला कसे वेठीस धरत आहे, हे दिसून येते. 

कारवाई सुरूच राहणार घरगुती वीज ग्राहक असो किंवा  कृषिपंपधारक असो, थकबाकीदार जो कोणी असेल त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना शासनातर्फे सवलत देऊनही याचा फार कमी शेतकर्‍यांनी फायदा घेतला आहे. त्यामुळे आता कुठलीही सवलत न देता कारवाई करण्यात येणार आहे. 

 सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता , औरंगाबाद परिमंडळ