Mon, Sep 28, 2020 08:44होमपेज › Aurangabad › ..अन् एक्‍स्‍प्रेस विनाडब्याची धावली (Video)

..अन् एक्‍स्‍प्रेस विनाडब्याची धावली (Video)

Published On: Feb 02 2019 2:47PM | Last Updated: Feb 02 2019 4:59PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

तुम्‍ही रल्‍वेने प्रवास करताय आणि त्‍या रेल्‍वेच्या इंजिनने डबे सोडून धावायला सुरूवात केली, तर आपली काय अवस्‍था होईल? अगदी अशीच अवस्‍था आज प्रवाशांची झाली. यामुळे प्रवाशांना मनस्‍ताप तर झालाच, शिवाय गाडी एक तास उशिराने सुटली. 

त्‍याचं झालं असं की, दौलताबाद रेल्‍वे स्‍टेशनवरून नांदेडकडे निघालेल्या सचखंड एक्स्प्रेसचे डबे जोडणारे कपलिंग वाटेत मधेच निघाले. यामुळे रेल्‍वेचे डबे मागे सोडून फक्‍त इंजिनच धावू लागले. ही घटना शनिवारी (दि.२) सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. एक्‍स्‍प्रेसचे डबे पाठीमागे राहिल्याचे दौलताबाद रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर लक्षात आले. तो पर्यंत रेल्वेचे इंजिन तब्‍बल अर्धा किलोमीटर पुढे निघून गेले होते.

या प्रकारानंतर एक्‍स्‍प्रेसचे इंजिन पुन्हा पाठीमागे घेऊन इंजिनला डबे पुर्ववत जोडण्यात आले. यानंतर  ही रेल्वे औरंगाबादला रवाना करण्यात आली. सुदैवाने यावेळी कोणताही अपघात घडला नाही. मात्र या घटनेमुळे सचखंड एक्‍स्‍प्रेसला एक तास उशीर झाला. यामुळे प्रवाशांना मनस्‍ताप सहन करावा लागला. या दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्यांना यावेळी आहेत तेथेच थांबवण्यात आले होते, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली.