होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : एसटी’ला दीड कोटीचा फटका

औरंगाबाद : एसटी’ला दीड कोटीचा फटका

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 04 2018 12:43AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

 कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदचा एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. मंगळवार (दि. 2) आणि बुधवारी या दोन दिवसांत औरंगाबाद विभागातील सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाला बसला आहे. औरंगाबाद विभागामध्ये दोन दिवसांत तब्बल दीड कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. याशिवाय महामंडळाच्या 28 गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. विशेष म्हणजे बुधवारी प्रवाशांअभावी एकही बस धावली नाही.

 कोरेगाव भीमा येथील घटनेचा दुसर्‍या दिवशीही शहरावर परिणाम जाणवला. विशेष म्हणजे दळणवळणाची जबाबदारी असलेल्या एसटी महामंडळाला याचा सर्वाधिक फटका बसला. एसटीच्या औरंगाबाद विभागामध्ये दररोज 490 गाड्यांचे शेड्यूल म्हणजे दोन हजार 300 फेर्‍या चालवल्या जातात. विभागाचे साधारण एका दिवसाचे उत्पन्न साठ लाख रुपये आहे. मात्र, मंगळवारी निम्म्यापेक्षा जास्त फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. बुधवारी तर दिवसभरात एकही बसगाडी आगाराच्या बाहेर पडली नाही. त्यामुळे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांत विविध ठिकाणी शिवशाहीसह इतर 28 बसगाड्यांची तोडफोड करण्यात आली. यात बसचे साधारण चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय नियंत्रक आर. एन. पाटील यांनी दिली.

प्रवासी आल्यास पोलिस बंदोबस्तात बस सोडण्याची तयारी महामंडळाने दाखवली होती. यासाठी पोलिसांनीही सहमती दर्शवली. मात्र, बुधवारी दिवसभरात बसस्थानकाकडे प्रवासी फिरकलेच नाहीत. मंगळवारी शहरात भीमा-कोरेगाव घटनेचे उमटलेले पडसाद आणि बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक, याची माहिती सर्वत्र पसरली होती. त्यामुळे नागरिकांनी प्रवास टाळणेच पसंत केले. प्रवासीच नसल्याने बससेवा बंद होती, असे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक पाटील यांनी सांगितले.

बंद आणि दंगलीच्या भीतीपोटी नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. मात्र, अत्यावश्यक कामासाठी जाणार्‍या बहुतांश प्रवाशांची गैरसोय झाली. बंदमुळे अ‍ॅपे आणि ऑटोरिक्षांसह इतर खासगी वाहतूक करणार्‍या वाहनांनी बुधवारी सेवा दिली नाही. अधिकृत सुटी नसल्याने कामानिमित्त, नोकरीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहन मिळाले नाही. त्यामुळे अनेकांवर पायपीट करण्याची वेळ आली. आरोग्य सेवेसह इतर महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडलेल्या काही प्रवासांचीही गैरसोय झाली.