औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित युवा एल्गार परिषदेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी युवकांनी आरक्षणाच्या मागणीवर तसेच शासनाकडून होणार्या विलंबाबद्दल तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देत नाट्यगृह दणाणून सोडले. भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी घालून विद्यार्थी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी झाले होते.
सुरुवातीला शाहीर सुरेश जाधव यांनी पोवाडा सादर केला. यानंतर मराठा आरक्षणावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. ईडब्ल्यूएस मराठा समाजाला कधीच मान्य नाही. एसीबीसी आरक्षण टिकवावे, ते शक्य नसल्यास मग ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. राजपूत, धनगर, ओबीसी समाजातील विद्यार्थी युवकांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या भाषणातून पाठिंबा जाहीर केला. आरक्षणाच्या लढाईत आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाची पहिली एल्गार परिषद औरंगाबादेत झाली. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका, सर्कलनिहाय मराठा युवा एल्गार परिषदेचे आयोजन करून युवकांमध्ये जनजागृतीसाठी मोठे आंदोलन उभारण्यात येईल. 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाची स्थगिती न उठल्यास 28 जानेवारीला सरकारविरोधात क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रमेश केरे पाटील यांनी दिला.