Fri, Feb 26, 2021 06:30
औरंगाबाद क्राईम : आईची हत्या करून बाप फरार; वयोवृद्ध आजी-आजोबा करताहेत लेकरांचा सांभाळ

Last Updated: Feb 21 2021 10:16PM

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

पिसादेवी (ता. औरंगाबाद) येथील कविता सिद्धेश त्रिवेदी हिच्या खुनाचे गूढ सहा दिवसांनंतरही कायम असून खून करून पसार झालेला पती सिद्धेश अद्याप मोकाट आहे. पोलिसांना त्याचा काहीही मागमूस लागलेला नाही. आईला संपवून वडील फरार झाल्यामुळे पोरक्या झालेल्या आठ आणि तीन वर्षांच्या दोन्ही लेकरांचा सांभाळ करण्याची जबाबदारी वयोवृद्ध आजी-आजोबांवर आली आहे. 

जाधववाडी बाजार समितीत कनिष्ठ लिपिक असलेल्या सिद्धेशचा २०१२ मध्ये कवितासोबत विवाह झाला होता. त्यांना आठ वर्षांचा रुद्र (लंकेश) आणि तीन वर्षांची त्रिशा ही दोन अपत्ये. १४ फेब्रुवारीला लग्नाला पुण्याला जाणार असल्याचे सिद्धेशने कविताला सांगितले होते. तो घराबाहेर पडला देखील. मात्र, तो पुण्याला गेलाच नाही. काही वेळाने तो घरी परतला तेव्हा दोघांचा कॉमन मित्र त्यांच्या घरी होता. तेव्हापासूनच सिद्धेशच्या डोक्यात कविताला संपविण्याचा कट शिजत असावा, असा संशय पोलिस वर्तवित आहेत. १५ फेब्रुवारीच्या रात्री आणि १६ फेब्रुवारीला पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास त्याने कविताशी वाद उकरून काढला. तिला डंबेल्सचा रॉड आणि कपडे धुण्याच्या दगडाने ठेचून मारले. तो एवढ्यारच थांबला नाही तर त्याने मुलगा रुद्रलाही बेदम मारहाण केली. यात रुद्रच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून डोळा काळा-निळा झाला. धक्कादायक म्हणजे, सिद्धशने तीन वर्षांच्या मुलीलाही मारहाण केली होती. 

तांत्रिक तपास, खबऱ्यांचे जाळेही पेरले

फरार होताना सिद्धेशने अत्यंत काळजी घेतल्याचे उघड होत आहे. मोबाईलही त्याने सोबत नेला नाही. त्यामुळे त्याचा माग काढणे अवघड जात आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तसेच, पोलिसांनी खबऱ्यांचे जाळेही पेरले आहे. त्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.