Wed, May 19, 2021 05:57
कटकारस्थान करून सरकारला बदनाम केलं जातंय; गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई

Last Updated: May 02 2021 4:26PM

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून प्रभावी काम करत आहे. परंतु, काही मंडळी जाणिवपूर्वक सरकाची प्रतिमा मलिन करत आहेत. राजकीय दृष्टीकोणातून कटकारस्थान रचत सरकारला बदनाम करत आहेत, असा आरोप गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई यांनी थेट नाव न घेता विरोधकांवर केला आहे. हे षडयंत्र कोण रचतंय, हे महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे, असेही ते म्हणाले. औरंगाबाद परिक्षेत्राचा आढावा घेण्यासाठी शंभूराजे देसाई रविवारी (दि. २) औरंगाबादेत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या ६७ हजारांच्यावर जात आहे. यात आरोग्य, महसूल विभागासोबतच पोलिसांचेही काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे या विभागाचा राज्यमंत्री म्हणून पोलीसांचे मनोबल वाढविण्यासाठी राज्यात बैठका घेत असल्याचे देसाई म्हणाले. तसेच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही उपाययोजना सुचविल्या आहेत. आतापर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद येथे बैठका झाल्या आहेत. पुढे अहमदनगरला बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीसांना १२-१२ तास काम करावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठीच पोलीस रस्त्यावर आहेत. त्यामुळे पोलीसांच्या अडचणी मी जाणून घेत आहे, असेही ते म्हणाले.

सतेज पाटलांकडून गर्दी, शंभूराजे म्हणाले माहिती घेतो...

कोल्हापुरात काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आज रविवारी या निवडणुकीसाठी मतदान झाले. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री (शहर) सतेज ऊर्फ बंटी पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांच्याविरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात सामना झाला. या निवडणुकीसाठी सतेज पाटलांनीच अनेकदा मोठ्या प्रमाणात गर्दी जमविली. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवले, याबाबत शंभूराजे देसाई यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मला नेमकी माहिती नाही. कधी आज घडलंय का, असे विचारीत नेमकी माहिती घेऊन यावर बोलतो, अशी सावध प्रतिक्रिया दिली.

परमबीर सिंग यांच्यावर योग्यवेळी कारवाई करु

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर होणाऱ्या आरोपांची चौकशी चालू आहे. काही प्रकरणात त्यांच्याविरुद्ध गुन्हे ही दाखल झाले आहेत. राज्य सरकार उचित वेळी परमबीर सिंग यांच्यावर योग्य ती कारवाई करेल, अशी माहिती गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली.