Tue, Sep 29, 2020 18:24होमपेज › Aurangabad › मतदार यादीसाठी बीएलओ नेट अ‍ॅपसह अधिकारी तुमच्या दारी

मतदार यादीसाठी बीएलओ नेट अ‍ॅपसह अधिकारी तुमच्या दारी

Published On: Dec 06 2017 5:24PM | Last Updated: Dec 06 2017 5:24PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जिल्ह्यातील मतदार यादी अपडेट करण्याबरोबरच मतदारांची सर्व कौटुंबिक माहिती घेऊन या कुटुंबांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी बीएलओ-नेट- अ‍ॅपची मदत घेतली जात आहे. त्यासाठी बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन मतदारांची कौटुंबिक माहिती गोळा करण्याची मोहीम निवडणूक विभागाने सुरू केली आहे. 

मतदार यादीत नवीन मतदारांची नोंदणी करण्यावर नागरिकांचा भर असतो. स्थलांतर केल्यानंतर मतदारसंघ बदलल्यास पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करून यादीत नाव समाविष्ट केल्या जाते. तसेच लग्न झालेल्या मुलींचे नाव, कुटुंबातील मयत झालेल्या सदस्यांचे नाव वगळण्यास नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्यात अडचणी येत होत्या. त्यासाठी आयोगाने आता बीएलओ-नेट-अ‍ॅप आणले असून, या अ‍ॅपमध्ये मतदाराची कौटुंबिक माहिती नोंदवण्यात येत आहे. 

बीएलओ घरोघरी जाऊन कुटुंबातील एकूण सदस्य, पुरुष-महिलांची संख्या, वय, एकूण मतदार, लग्न झालेल्या, मयत झालेल्यांची नावे, सदस्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल अ‍ॅड्रेस अशी सर्व माहिती घेत आहेत. या माहितीचा उपयोग निवडणुकीच्या काळात संबंधित मतदाराला निवडणूक आयोगाच्या सूचना, माहिती मोबाइलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे पाठवण्यास मदत होईल.  

एखाद्या सदस्याचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यास त्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी सूचना दिली जाईल, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. बीएलओ-नेट-अ‍ॅपद्वारे नोंदणीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने राज्यातील पाच विधानसभा मतदारसंघात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत, यात पुणे जिल्ह्यातील बारामती, यवतमाळमधील राळेगाव, नाशिकमधील दिंडोरी, परभणीतील पाथरी, मुंबई उपनगरांतील बांद्रे विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यांत ऐच्छिक स्वरूपा अ‍ॅपच्या सहायाने कुटुंबाची माहिती नोंदवण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले