Sun, Aug 09, 2020 05:58होमपेज › Aurangabad › महाऊर्जाचे व्यवस्थापक ४० हजारांची लाच घेताना जेरबंद

महाऊर्जाचे व्यवस्थापक ४० हजारांची लाच घेताना जेरबंद

Published On: Jan 05 2018 1:34AM | Last Updated: Jan 05 2018 1:07AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

सोलार रूफ टॉप सिस्टीमच्या अनुदानाच्या प्रस्तावाचे जॉइंट इन्स्पेक्शन रिपोर्टवर स्वाक्षरी करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाचे व्यवस्थापक हरीश नरहर पाटील (55, रा. जवाहरनगर ठाण्याजवळ, गारखेडा परिसर) यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. नवीन वर्षातील हा पहिलाच ट्रॅप ठरला असून डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील ही चौथी कारवाई आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा सोलार एनर्जी सिस्टीमचा खासगी व्यवसाय आहे. नियमाप्रमाणे सोलार सिस्टीमच्या खरेदीवर महाऊर्जा कार्यालयाकडून केंद्राचे अनुदान वितरित केले जाते. तक्रारदार यांनी औरंगाबादेतील 11 जणांच्या घरी सोलार रूफ टॉप सिस्टीम बसविली आहे. नियमाप्रमाणे 30 टक्के अनुदानासाठी त्यांनी ारहर्रीीक्षर.लेा/सशीीं वर लॉगइन करून कामाच्या इन्स्पेक्शनसाठी विनंती केली. त्यानुसार, कार्यालयाच्या वतीने इन्स्पेक्शन करून जॉइंट इन्स्पेक्शन रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांनी संबंधित कार्यालयात जाऊन अनुदान मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी व्यवस्थापक हरीश पाटील याने तब्बल 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून 40 हजार रुपये मागितले. 

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. गुरुवारी एसीबीच्या अधिकार्‍यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात व्यवस्थापक पाटील 40 हजार रुपयांची लाच मागत असल्याचा पंचनामा करण्यात आला. अखेर सापळा रचून हरीश पाटील याला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बाळा कुंभार, एस. एस. शेगोकार, निरीक्षक अनिता वराडे, पोलिस नाईक संदीप आव्हाळे, अश्‍वलिंग होनराव, दिगंबर पाठक, बाळासाहेब राठोड, मिलिंद इप्पर, संदीप चिंचोले यांच्या पथकाने केली. 

ऑनलाइन तक्रारीची घेतली दखल

औरंगाबाद एसीबी कार्यालयाच्या मेल आयडीवर तक्रारदाराने ऑनलाइन तक्रार केली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन एसीबीच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. यापुढेही तक्रारदार एसीबीकडे ऑनलाइन तक्रार करू शकतात, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी केले. 

घराचीही झडती घेतली

एसीबीच्या एका पथकाने बीड बायपासवरील महाऊर्जाच्या कार्यालयात सापळा यशस्वी केल्यानंतर लगेचच दुसर्‍या पथकाने आरोपी हरीश पाटील याच्या जवाहरनगर ठाण्याजवळील घराची झडती घेतली. त्यात नेमके काय हाती लागले, याची माहिती उशिरापर्यंत समजू शकली नाही, मात्र पथकाने घर झडती घेतल्याचे परोपकारी म्हणाले.