Wed, Jun 23, 2021 01:56
औरंगाबाद : लाचेतील हवालदार निलंबित झाल्यावर 'त्या' कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated: Jun 05 2021 1:37PM

संग्रहीत फोटो
औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : कंपनी कामगाराच्या खिशात गांजा सापडला म्हणून त्याच्या ठेकेदाराला कारवाईच्या धमक्या देत हवालदाराने ६० हजारांची लाच घेतली होती. या प्रकरणात हवालदार गणेश अंतरप निलंबित करण्यात आले. उपनिरीक्षक सतीश पंडित यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांना जाग आली आणि त्यांनी आता 'त्या' कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, त्याच्या खिशात १०० रुपयांचा गांजा सापडल्याचे पोलिसांनीच तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणामुळे एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या 'वसुली'ची मोडस मात्र उघड झाली आहे. दुय्यम निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी फिर्याद दिली अन् वरिष्ठ निरीक्षक मधुकर सावंत तपासाला सुरूवात केली. दीपक मंगेश खैरनार असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे.

वाचा : औरंगाबाद : तीन राज्‍यातील अनेकांची फसवणूक करणारा भामटा ९ महिन्यानंतर गजाआड

एमआयडीसी वाळूज परिसरात यशश्री प्रेस कॅम्पस नावाची कंपनी आहे. या कंपनीत ठेकेदारामार्फत दीपक खैरनार हा कामाला लागला. कंपनीत अंगझडतीमध्ये त्याच्या खिशात गांजाची पुडी आढळल्याचा तक्रारी अर्ज कंपनीने पोलिस ठाण्यात दिला होता. तेव्हा उपनिरीक्षक सतीश पंडित डिओ अधिकारी तर हवालदार गणेश अंतरप हा पीएसओ होते. गणेश अंतरपने हा अर्ज स्वत:कडे ठेवून घेतला. त्यानंतर कामगाराला सोडून दिले. यानंतर गणेश अंतरप यांने कामगारांच्या ठेकेदाराला फोन करून कारवाईच्या धमक्या देत दीड लाख रुपयांची लाच मागितली. ठेकेदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर ६० हजार रुपयांची लाच घेताना गणेश अंतरपला अटक करण्यात आली. सध्या गणेश अंतरपला कामातून निलंबित केले आहे. तसेच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले उपनिरीक्षक पंडित यांची विभागीय चौकशी सुरू करून त्यांना नियंत्रण कक्षात हलविले आहे.

वाचा :औरंगाबाद : कुख्यात गुन्हेगार जम्याचा निर्घृण खून, पैशांच्या देवाण-घेवाणीतून धारदार शस्त्राने हल्ला

यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे दुय्यम निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या तक्रारीवरून कामगार दीपक खैरनारविरुध्द गुन्हा रजिस्टर क्रमांक ६२४/२०२१ कलम ८ (क) २० (ब) २ (अ) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ नुसार गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार करणाऱ्या कंपनीने फिर्याद द्यायला मात्र दिला नकार

तक्रारीत म्हटल्यानुसार, दीपक खैरनार हा कंत्राटी कामगार असून आज तक्रारी अर्जदार यांना संपर्क करून या दीपकविरुध्द तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर होण्यासाठी विनंती केली होती. मात्र, कंपनीने तक्रार देण्यास नकार दिला. यावेळी दीपककडे ५० रुपये किमतीच्या एका पारदर्शक छोट्या प्लास्टिक पन्नीसह २.७६० वजन व विनापन्नीचे १.४२० ग्रॅम वजनाचा ओलसर अमली पदार्थ गांजासदृश वस्तू असलेली एक पुडी ५० रुपये किमतींच्या वस्तु सापडल्या होत्या. त्याच्याकडे एकूण शंभर रुपयांच्या वस्तु मिळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.