Mon, Apr 12, 2021 03:25
औरंगाबाद : अंधारीत कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Apr 07 2021 9:30AM

अंधारी (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा 

सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. 

वाचा :औरंगाबाद : जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील शेतकरी अप्पाराव शेषराव तायडे (वय ४५) यांनी रविवारी सायंकाळी पत्नी लताबाई यांना घरातून निघताना मी मळीची गाडी भरण्यासाठी जात असल्याचे सांगितले होते. सोमवारी (दि.५) सकाळी त्यांना फोन केला असता ते फोन उचलत नव्हते. सायंकाळपर्यंत ते घरी येणार म्हणून पत्नी लताबाई व मुलगा कार्तिक हे सकाळी जेवण करून आपल्या शेतात बाजरी पिकाला पाणी देण्यासाठी गेले. याच दरम्यान मुलगा कार्तिक याला आपले वडील  शेतात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याने आरडाओरड केल्याने आई व आजूबाजूला शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी आवाज ऐकूण घटनास्थळी धाव घेतली. ते त्यांच्या शेतातील  गट क्र. ८२ मध्ये बेशुध्द अवस्थेत पडलेले आढळून आले. 

सदरील घटनेची माहिती अंधारी येथील पोलिस पाटील कल्पना दिनेश खराते यांना देण्यात आली. त्यांनी ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. सदर शेतकऱ्यास रुग्णवाहिकेद्वारे सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. सोमवारी रात्री कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

वाचा : दोन मंत्री गेले...आणखी चार जातील : किरीट सोमय्या

नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे अप्पाराव तायडे यांच्यावर कर्ज असल्यामुळे ते चिंतेत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी. संबंधित घटनेचा तपास प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  बीट जमादार मदन नागरगोजे, प्रमोद शिंदे करीत आहे.

वाचा : औंरगाबाद :विहिरीत बुडून विद्यार्थीनीचा मृत्यू