Tue, Aug 04, 2020 10:09होमपेज › Aurangabad › मनपाने विकत घेतला अर्धा कोटीचा अंधार

मनपाने विकत घेतला अर्धा कोटीचा अंधार

Published On: Nov 12 2018 1:28AM | Last Updated: Nov 12 2018 1:28AMऔरंगाबाद : राहुल जांगडे

 स्मार्ट सिटी योजनेतील पॅनसिटीअंतर्गत प्रस्तावित रूट ऑफ सोलार पॅनल 13 सप्टेंबरपासून महापालिका मुख्यालयात कार्यान्वित झाला. यासाठी तब्बल 53 लाखांचा निधी खर्च झाला, परंतु ऑन ग्रेट असलेल्या या तंत्रज्ञानापासून वीज सेव्हिंगच (साठवणूक) होत नसल्याने लोडशेडिंगच्या वेळी महापालिकेत एकदाही ‘प्रकाश’ पडलेला नाही. त्यामुळे पालिकेने तब्बल अर्धा कोटी रुपये खर्चून अंधाराचे ओझे विकत घेतल्याचे बोलले जात आहे.

26 जानेवारीला पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी केवळ 45 दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. मात्र, कंत्राटदाराने आठ महिन्यांचा अवधी घेतला. दोन महिन्यांपूर्वी महापालिका मुख्यालयातील इमारत टप्पा क्रमांक-3 च्या वरच्या मजल्यावर हे सोलार पॅनल बसवून कार्यान्वित करण्यात आले आहे. आदी ऊर्जा प्रा. लिमिटेड कंपनीने 53 लाख रुपयांत हे काम केले आहे. यातून 400 ते 500 युनिट वीज निर्माण होऊन रोजची 5 हजार रुपयांच्या विजेची बचत होणार आहे. म्हणजेच पालिकेला महिन्याकाठी महावितरणला द्याव्या लागणार्‍या कोटींच्या बिलापैकी दीड लाख रुपयांचा खर्च वाचणार, असा दावा करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात बचतीच्या रकमेची, विजेची संबंधित विभागाकडून जुळवा-जुळव सुरू असल्याने अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही, परंतु या सोलार पॅनलमुळे एक टक्‍काही विजेची साठवणूक होत नसल्याने लोडशेडिंगच्या वेळी महापालिकेत अंधार पसरत आहे. वीज गेल्यावर मनपा अजूनही जनरेटरवरच अवलंबून आहे. त्यामुळे सोलार पॅनलचा उपयोग काय असा प्रश्न मनपात येणार्‍या आगंतुकांसह कर्मचार्‍यांनाही पडला आहे. मात्र, वीज गेल्यावर सोलार पॅनलवर मनपातील दिवे लागतात, असा दावा विद्युत विभागाचे अभियंता के. डी. देशमुख यांनी केला आहे.

ऑफ ग्रेड तंत्रज्ञान असावे

मनपा इमारतीवर बसविलेले रूट ऑफ सोलार पॅनल ही यंत्रणा ऑन ग्रेट तंत्रज्ञानाची आहे. यातून विजेची साठवणूक करता येत नाही. त्यासाठी अद्ययावत अशी ऑफ गे्रड तंत्रज्ञानाचे सोलार पॅनल लागते. बॅटर्‍या लागतात. त्याच्यासाठी सुमारे 70 लाख रुपयांचा खर्च आला असता असे ठेकेदाराच्या प्रतिनिधीने सांगितले. तर त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचा मोठा खर्च करावा लागला असता, असे स्पष्टीकरण मनपाच्या विद्युत विभागाने केले.

 स्मार्ट सिटीतील पहिला प्रकल्प

 स्मार्ट सिटीतील हा पहिला प्रकल्प पूर्ण झाल्याचे समाधान सोलार पॅनलच्या उद्घाटनप्रसंगी मनपा पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केले होते. तसेच आगामी काळात स्मार्ट सिटीतून जायकवाडी, फारोळा येथेही अशा प्रकारे सौरऊर्जा प्रकल्प बसवून पालिकेची मोठी बचत करण्याचा मानस पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केला होता. 

या प्रकल्पाचा उद्देश सफल

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सोलार पॅनल पालिकेवर लावले आहे. हा सोलार प्रकल्प वीज साठवणुकीचा नाही तर विजेची व वीज बिलाची बचत करणारा आहे. ज्या उद्देशाने हा सौर ऊर्जा प्रकल्प लावला आहे, तो उद्देश त्यातून पूर्ण होतो, असे स्पष्टीकरण आदी ऊर्जाचे एम. राऊत यांनी दिले.