Fri, Oct 02, 2020 00:25होमपेज › Aurangabad › किडनीसाठी डॉक्टरची कोर्टात धाव !

किडनीसाठी डॉक्टरची कोर्टात धाव !

Published On: Dec 06 2017 5:14PM | Last Updated: Dec 06 2017 5:14PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

दोन्ही किडनी निकामी झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबातील इतर कुणाचीही किडनी त्याच्याशी जुळत नाही, मात्र त्यांच्या सख्ख्या परंतु गतिमंद  असलेल्या भावाचा रक्‍तगट तसेच किडनी जुळत असल्याने त्याच्या किडनीदानास परवानगी देण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणी शुक्रवारी (दि.7) सुनावणी ठेवली आहे.

या प्रकरणी दाखल याचिकेनुसार, यवतमाळ येथील डॉ. अतुल पवार यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. त्यांच्या वडिलांचे वय 70 वर्षे आहे. त्यामुळे ते किडनी देऊ शकत नाहीत. एक शिक्षक असलेल्या भावाची किडनी जुळत नाही, बहिणीला लहानपणीच आईने किडनी दिलेली आहे. अशा परिस्थितीत त्यांचा एक भाऊ जो गतिमंद आहे, त्याचा रक्‍तगट आणि किडनी डॉ. पवार यांच्याशी जुळतात. त्यांच्यावर कमलनयन बजाज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बजाज रुग्णालयाच्या ‘कमिटी फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट’ने दाता हा गतिमंद असल्याने त्याच्या अवयवांचे दान करता येत नाही असा निवाडा दिला आहे. गतिमंद मुलाची किडनी डॉक्टर भावाला देण्यासंदर्भात सर्व कुटुंबीयांची संमती असल्याचे नमूद करून, या किडनीदानास परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. 

तपासणीचे निर्देश 

खंडपीठाने बजाज रुग्णालयातील समिती, विभागीय समिती आदींना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. इतर कुणा नातेवाइकांची किडनी जुळते का, याची तपासणी करवून घेण्याचे खंडपीठाने निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. पी. के. जोशी, तर शासनातर्फे अ‍ॅड. स्वप्निल जोशी काम पाहात आहेत.