Fri, Feb 26, 2021 07:12
औरंगाबाद : गर्दी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा; विभागीय आयुक्तांनी दिला इशारा 

Last Updated: Feb 17 2021 7:13PM

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाट शक्यता निर्माण झाली असून काही ठिकाणी नव्या स्ट्रेनचे रुग्णही आढळत आहेत. त्यामुळे हा धोक्याचा इशारा आहे. तातडीने सर्व यंत्रणा पुन्हा सज्ज करा, गर्दी रोखणे, मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, मॉल्स, कोचिंग क्लासेस, शाळा, मंगल कार्यालयांना नोटीस बजावून गर्दी रोखण्याचे आदेश द्या, न ऐकल्यास १५ दिवसांसाठी सील करा, असे आदेशच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अधिक वाचा : औरंगाबाद : अब की बार बूरे फसे यार! युवक काँग्रेसकडून क्रिकेटरच्या वेशात 'पेट्रोल' सेंच्युरी सेलिब्रेशन

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. मराठवाड्यात देखील वेगळी स्थिती नसून येथेही मागील दोन आठवड्यांपासून आठही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या लाटेमुळे राज्य शासन सतर्क झाले आहे. रुग्णवाढीवरून मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यात मराठवाड्याबाबत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी केल्या. त्याबाबत केंद्रेकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे संवाद साधला. यात त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाचा उद्रेक झाल्यावर ज्या काही सेवासुविधा उभ्या केल्या होत्या, त्या पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक वाचा : औरंगाबाद : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईच्या अंगावर दिवसभर खेळली चिमुकली

नव्याने चाचण्या वाढविण्याचे आदेश 

नव्याने चाचण्या वाढविण्याचे आदेश देत त्यांनी जो कोणी तपासणीला विरोध करेल त्याच्यावर महामारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले आहेत. मार्च ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात ज्या पद्धतीने कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणा सज्ज होत्या. त्या पुर्ववत करण्यात याव्यात, असेही ते म्हणाले. सध्या गर्दीचे ठिकाण हे प्रामुख्याने लग्न समारंभ, अंत्यविधी, मॉल्स, बाजार, बैठका, सभा असून यातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पथक नियुक्त करा, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस आणि मॉल्समध्ये जाऊन तपासणी करा, गर्दी अढळल्यास पहिल्यांदा नोटीस द्या, दुसऱ्यांदा त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून १५ दिवसांसाठी ते सील करा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

प्रशासन मात्र झोपेत 

जिल्ह्यात अचानक कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. लग्न समारंभ असो, मॉल्स असो यात गर्दी होत आहे. परंतु असे असतांनाही प्रशासन मात्र झोपेत असल्याचेच दिसत आहे, अशा शब्दात विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनाची खरडपट्टी केली.

अधिक वाचा : औरंगाबाद झेडपीचे तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

मास्क नसणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

विभागातील प्रत्येक जिल्हा प्रशासनाने पोलिसांना सोबत घेऊन मास्कविना फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरूवात करावी. जो कोणी मास्क घालणार नाही. त्याच्याकडून पहिल्यांदा दंड वसूल करावा, दुसऱ्यांदा अढळल्यास दंडासह त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. दंडाची जी रक्कम जमा होईल. त्यातील आर्धी रक्कम पोलिस प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे.

चाचण्या न करणाऱ्यांवर गुन्हे करा

मराठवाड्यात सध्या डॉक्टर्स सर्दी, ताप असलेल्या रुग्णांना औषधोपचार करून घरी सोडत आहेत. परंतु डॉक्टरांनी आता त्या सर्वांना कोरोना चाचण्याची सक्ती करावी. जो रुग्ण कोरोना चाचण्या करणार नाही व बेफिकीरपणे सार्वजनिक ठिकाणी फिरेल. त्यांच्याविरोधात महामारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

अधिक वाचा : FAStag साठी कोणती डॉक्युमेंट लागतात माहीत आहे का? आणि तो कसा खरेदी कराल?

परभणी, हिंगोली, बीडवर नाराजी

मराठवाड्यात सध्या परभणी, हिंगोली, बीड या तीन जिल्ह्यांमध्ये मोठमोठे लग्न समारंभ होत आहेत. अन् कोरोना चाचण्याचे प्रमाणही अतिशय कमी आहे, असे म्हणत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चाचण्यानंतर त्यांच्या सपर्कात येणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी सांगितले.