Tue, Aug 04, 2020 10:39होमपेज › Aurangabad › फ्लिपकार्टवर मागवला मोबाईल, मिळाली वीट

‘ऑनलाइन’ची बोगसगिरी; मोबाइलऐवजी मिळाली वीट

Published On: Oct 15 2018 8:22PM | Last Updated: Oct 15 2018 8:22PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ऑनलाइन बाजारात केव्हा काय होईल याची काही शाश्‍वती नाही. एका ग्राहकाने ‘फ्लिपकार्ट’वरून मोबाइल मागविला. क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिल्यानंतर पाच दिवसांनी पार्सल घरी आले. पण, त्यात मोबाइलऐवजी चक्‍क वीट निघाली. यामुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन भानुदास खरात (३४, रा. सुदर्शननगर, एन-११, हडको) यांचे मयूरपार्क रोडवर गजानन मल्टिसर्व्हीसेस नावाचे दुकान आहे. ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी ‘फ्लिपर्काट’वरून मोटो ई-५ कंपनीचा मोबाइल मागविला. त्यासाठीचे ९ हजार १३९ रुपये अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून फ्लिपकार्टच्या खात्यात जमा केले. त्यानंतर १३ ऑक्टोबरला मोबाईल पार्सलने येईल, असे समजले. प्रत्यक्षात १४ ऑक्टोबरला ई-कार्ट लॉजिस्टीक नावाच्या कुरियरचा मोहंमद जकेरिया सय्यद अली हा पार्सल घेऊन आला. पार्सल हातात पडताच गजानन खरात यांनी उत्सुकतेने ते खोलून पाहिल्यावर मोबाइलऐवजी चक्‍क विटांचे तुकडे आढळून आले. विशेष म्हणजे, विटांचे तुकडे कॅरिबॅगमध्ये पॅक केलेले होते. यावरून हा मुद्दाम खोडसाळपणा केल्याचेही स्पष्ट जाणवते. या प्रकारामुळे खरात यांना धक्‍का बसला. त्यांनी लगेचच कुरियर घेऊन आलेल्या मोहंमद जकेरियाला याचा जाब विचारला. त्यानंतर त्याने आमचे काम फक्‍त कुरियर पोहोच करण्याचे असते. बॉक्समध्ये काय आहे? हे आम्हाला माहिती नसते, असे सांगून तो निघून गेला. 

गजानन खरात यांनी त्यानंतर हर्सूल ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.