Wed, May 19, 2021 06:06
औरंगाबाद : कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन, ८ जणांचा मृत्यू, ९६ जणांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया

Last Updated: May 03 2021 11:00AM

औरंगाबाद : पुढारी वृत्‍तसेवा 

कोरोनातून बरे होऊन घरी परतल्यानंतर अनेक रुग्ण फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य आजार) चे शिकार ठरत आहेत. फंगल इन्फेक्शनमुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून, १३ जणांचे डोळे काढावे लागले आहेत. तसेच ९६ जणांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. महापालिकेच्यावतीने आयोजित शहरातील डॉक्टरांच्या बैठकीत रविवारी ही धक्कादायक माहिती समोर आली. 

कोरोनानंतर उद्भवणाऱ्या आजारांबाबत मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक पार पडली. यात डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची आणि त्यांच्यात आढळणाऱ्या आजारांची माहिती दिली. बैठकीस मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अरुण अडचित्रे, डॉ. नळगीरकर, डॉ. अमित विश्वे, डॉ. झवर, डॉ. मिश्रीकोटकर, घाटीतील नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. वसंत पवार, डॉ. वरे, डॉ. प्रवीण सोनवतीकर, डॉ. भारत देशमुख, डॉ. अमोल सुलाखे, डॉ. सावजी व डॉ. रितेश भागवत यांची उपस्थिती होती.

अधिक वाचा : जखमी वाघिणी जिंकली! देशाने पं. बंगालकडून शिकावे- शिवसेना 

डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, कोविडनंतर शहरात बुरशीजन्य आजार असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोविडमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. अनियंत्रित मधुमेह आणि कोविडमुळे हे इन्फेक्शन उद्भवते. त्याचे लवकर निदान झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होतो. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरू शकतो. शहरातील डॉक्टरांकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत या आजारामुळे जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ जणांचे डोळे काढावे लागले आहेत. ९६ जणांच्या जबड्यावर आणि सायनसमुळे १०५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. 

अधिक वाचा : प्रशांत किशोर : मोदींना निवडणुकांत सर्वाधिक वेळा हरवणारा माणूस

बुरशीजन्य आजाराची लक्षणे

फंगल इन्फेक्शनची सुरूवात नाकापासून होत असून नंतर ते हळूहळू टाळू, डोळे व मेंदूपर्यंत पसरते. नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा, नाक, टाळू (हार्ड पालट) येथे आढळणे, दात दुखणे, गाल दुखणे, चेहऱ्याच्या हाडांना (जबडा) असह्य वेदना होणे, डोळा दुखणे, डोळा सुजणे व दृष्टी कमजोर होणे ही लक्षणे आढळून येतात.


इन्फेक्शनच्या पायऱ्या

हा आजार होताना सुरुवातीला नाकापर्यंत मर्यादित (नाक व सायनसेस) असतो. त्यानंतर डोळ्यापर्यंत पसरत जातो. याकडे दुर्लक्ष झाले तर मेंदूपर्यंत पसरत जाऊन रुग्ण हा बेशुद्ध पडणे व त्यास अर्धांगवायू होणे असे प्रकार घडतात.

तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी

हा आजार उद्भवल्यास रुग्णाने तातडीने नाकाची दुर्बिणीद्वारे तपासणी करून घ्यावी, नाकातील स्त्रावाची बुरशी जंतूसाठी (को-माउंट) तपासणी करावी. तसेच डोळे व सायनसमधील बुरशी जंतुसंसर्ग शोधण्यासाठी सीटी स्कॅन व एमआरआय करावे.

उपचाराची दिशा ठरली

मनपात आयोजित बैठकीत या फंगल इन्फेक्शनबाबत उपचाराची दिशा ठरविण्यात आली. इन्फेक्शन आढळून आल्यास तातडीने बुरशीरोधक औषधी (इंजेक्शन) (अ‍ॅम्फोटेरेसीन-बी, फोसॅकोनॅझोल) हे द्यावे किंवा सर्जिकल उपचार करावेत. सौम्य बिटाडीनचे नाकात ड्रॉप टाकावेत, अशा पद्धतीने बैठकीत उपचाराची दिशा ठरविण्यात आली.