होमपेज › Aurangabad › एकबोटे, भिडे यांच्याविरुद्ध औरंगाबादेतही गुन्हा

एकबोटे, भिडे यांच्याविरुद्ध औरंगाबादेतही गुन्हा

Published On: Jan 05 2018 1:34AM | Last Updated: Jan 05 2018 1:15AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

भावसिंगपुर्‍यातील पेठेनगर येथील जयश्री सुदाम इंगळे यांच्या फिर्यादीवरून मिलिंद एकबोटे, मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, अनिल दवे आणि 20 ते 25 जणांच्या जमावाविरुद्ध औरंगाबादेतील छावणी ठाण्यातही विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला. कोरेगाव-भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या औरंगाबादेतील नागरिकांना त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली, मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा गुन्हा पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर ठाण्यात वर्ग करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री इंगळे या आपल्या सहकार्‍यांसह 1 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे विजयदिन साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे आरोपी एकबोटे, भिडे यांच्यासह जमावाने आमच्या गाड्या अडविल्या. गाड्यांवर लाठ्या मारून तोडफोड केली. तसेच, शिवीगाळही केली. दरम्यान, आमच्यातील काहींनी पाणी मागितले तर पाणी न देता बहिष्काराची भाषा केली, असे तक्रारीत म्हटले आहे. यात आमच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचेही इंगळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून औरंगाबादेत तणाव असल्याने माघारी परतल्यानंतर गुन्हा नोंद करता आला नाही. अखेर 3 जानेवारी रोजी छावणी ठाण्यात या प्रकरणी तक्रार देण्यात आली.