Sun, Aug 09, 2020 05:01होमपेज › Aurangabad › भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर १६ आरोपींना अटक

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर १६ आरोपींना अटक

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 04 2018 12:34AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहर परिसरात विविध ठिकाणी झालेल्या दगडफेक, जाळपोळ, हल्ल्यांच्या गुन्ह्यांमध्ये 16 आरोपींना अटक करून त्यांना बुधवारी (3 जानेवारी) न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. त्याशिवाय तीन महिला आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली व तीन पुरुष आरोपींना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.

याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यामध्ये नारायण सुभाष साळवे (32, रा. नागसेन नगर), आनंद उत्तम दाभाडे (22, रा. फुलेनगर), शुभम दिलीप मगरे (19, रा. सातारा परिसर), विशाल राजेंद्र खरात (21, रा. फुलेनगर), राजू दादाराव गायकवाड (30, रा. लाडगाव, ता. जि. औरंगाबाद), अजय अशोक म्हस्के (19, रा. फुलेनगर) या आरोपींविरुद्ध कलम 307, 353, 332, 333, 336, 426, 141, 141, 143, 144, 147, 148, 149, 151, 152 सह मुंबई पोलिस कायद्याचे कलम 135 व मालमत्ता नुकसान कायद्याचे कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल झाला. वरील आरोपींना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना रविवारपर्यंत (7 जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांनी दिले. 

याच प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यामध्ये संदीप भुजंगराव कांबळे (27, रा. वडगाव, कोल्हाटी), जालिंदर रघुनाथ सोनवणे (21, रा. वडगाव कोल्हाटी), अशोक भाऊसाहेब वाहूळ (28, रा. सिडको, वाळूज महानगर) याआरोपींविरुद्ध 143, 147, 149, 353, 332, 333, 336, 337, 307, 427, 294, मुंबई पोलिस कायद्याचे कलम 135 व मालमत्ता नुकसान कायद्याचे कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल झाला. त्यांना गुरुवारपर्यंत (4 जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. बी. अत्तार यांनी दिले. याच गुन्ह्यामध्ये सिडको पोलिस ठाण्यामध्ये संतोष सांडू साळवे (32, रा. एन-11, हडको), अतुल उत्तमराव दाभाडे (27, रा. सिद्धार्थनगर, एन-11), राहुल प्रल्हाद डेरे (35, रा. एन-12), राजपाल धनराज जावळे (39, रा. एन-11, हडको), विकेस रतन साबळे (22, रा. आंबेडकरनगर), रवी चरणदास शिंदे (27, रा. आंबेडकरनगर), सुनील भाऊसाहेब बोर्डे (19, रा. नामांतर कॉलनी, एम-12) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक होऊन न्यायालयात हजर करण्यात आले असता शुक्रवारपर्यंत (5 जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अत्तार यांनी दिले. याच पोलिस ठाण्यांतर्गत तीन महिलांना अटक होऊन न्यायालयाच्या आदेशाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली व तीन पुरुष आरोपींना अटक होऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या प्रकरणांमध्ये सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती, सूर्यकांत सोनटक्के आदींनी काम पाहिले.

कोर्टाला छावणीचे स्वरूप

वेगवेगळ्या प्रकरणांमधील दंगलखोरांना कोर्टात हजर करण्यात आले होते व त्यामुळे कोर्टात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता. कोर्ट परिसरात जागोजागी पोलिस दिसून येत होते.