Sat, Aug 08, 2020 14:29होमपेज › Arthabhan › लक्ष्मीची पावले : परदेशी कंपन्यांचे शेअर्स वधारणार!

लक्ष्मीची पावले : परदेशी कंपन्यांचे शेअर्स वधारणार!

Published On: Jul 08 2019 1:30AM | Last Updated: Jul 08 2019 1:30AM
डॉ. वसंत पटवर्धन
 

अर्थसंकल्प, पावसाळा, रिझर्व्ह बँकेची धोरणे, विशेषतः रेपो दर यावर बाजारातली हालचाल होत असते.  पूर्वी या घटनांच्यावेळी बरेच चढउतार व्हायचे. मात्र बाजाराने आता बाळसे धरलेले असल्यामुळे 300, 400 अंकांइतकाच फरक दिसतो. 

गेल्या आठवड्यात भारताच्या महिला अर्थमंत्री यांनी आपला पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी 5 तारखेला संसदेला सादर केला. त्याबाबतचा स्वतंत्र लेख  प्रसिद्ध झालेला आहेच; तो वाचकांनी नजरेखालून घातलेला असेलच. 

पूर्वी अर्थसंकल्पानंतर  प्रसार माध्यमातून ‘काय महागले? काय स्वस्त झाले?’ याबद्दलच्या चर्चा व्हायच्या. उत्पादनावरील उत्पादन कर  (Excise Duty) आणि आयात कर (Customs Duty) यात बदल व्हायचे त्यामुळे त्याचा परामर्श तशा पद्धतीने घेतला जायचा. आता उत्पादनकराला सेवाकराची जोड देऊन नवीन वस्तुसेवाकर दोन वर्षांपासून सुरू केला गेला आहे. त्यामुळे उत्पादन कर हा विषय कालबाह्य झाला आहे. बजेटपूर्वी एक आर्थिक सर्वेक्षण संसदेसमोर ठेवले जायचे. यंदाही ते तसे ठेवले गेले. ज्यांना सर्वेक्षणाबद्दल जास्त माहिती हवी असेल त्यांनी सर्वेक्षणाचा दुसरा भाग म्हणून जोडलेल्या विविध तक्त्यांचा अभ्यास करावा. 

बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा काही वर्षांपूर्वी दिली गेली होती. ती आणखी पुढे नेऊन ‘बेटी आपकी धनलक्ष्मी है, आपकी विजयलक्ष्मी है’ असा बदल आवश्यक असल्याचे अहवाल सुचवतो. आर्थिक अहवालानंतर पुढे अन्य काही बाबींचा  परामर्श घेतला आहे. 

महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर-पुणे-मुंबई अशा अनेक महामार्गांवर महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या अनेक ‘शिवनेरी’ धावत असतात. त्यातली मुंबई-पुणे रस्त्यावर धावणार्‍या शिवनेरींच्या भाड्यात  80 ते 120 रुपयांची कपात केेली गेली आहे. ही कपात आजपासून म्हणजे 8 जुलैपासून लागू होईल. अशीच कपात  पुणे-सातारा-कोल्हापूर-बेळगाव या प्रवासासाठीही हवी आहे. शिवनेरीच्या रोज मुंबई-पुणे अशा 435 फेर्‍या होतात. दरमहा सुमारे 1॥ लाख प्रवासी या सेवेचा फायदा घेतात. दर कमी केल्यामुळे  प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी परिवहन मंडळाची अपेक्षा आहे. (मात्र गेल्या आठवड्यातील अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलचे भाव 1 रुपयाने वाढवल्यामुळे परिवहन मंडळाला भाडेकपात न करण्यासाठी एक कारण मिळाले आहे. शिवनेरीप्रमाणेच अन्य खासगी गाड्यांनीही आपल्या भाड्यात कपात करायला हवी. 

अर्थसंकल्प बेचव आणि कळाहीन असल्यामुळे शेअरबाजाराची निराशा झाली आहे. निर्देशांक सुमारे 400 अंकांनी घसरून 39512 वर आला आहे. तर 11811 वर थांबला. निफ्टीतही 135 अंकांची घसरण आहे. 

बँकांची अनर्जित कर्जे कमी झाल्यामुळे आणि राष्ट्रीयीकृत बँकांत सरकार  75000 कोटी रुपयांचे भांडवल घालील, या घोषणेमुळे बँक निफ्टी मात्र  नाममात्र सुधारला आणि 31475 वर स्थिरावला. 

अनेकदा परामर्श घेतलेल्या बजाज फिनान्समध्येही नाममात्र घट होऊन शुक्रवारी बाजार बंद होताना तो 3720 रुपयाला उपलब्ध होता. या भावात अजूनही तो घेण्यासारखा आहे. कारण  वर्षभरात तो 4400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 

इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवूणक करणार असल्यामुळे लार्सेन टूब्रोसारख्या कंपनीला बरीच कामे मिळतील. मेट्रो रेल्वेतही जास्त किलोमीटर्स मार्ग वाढण्यासाठी गुंतवणूक होणार आहे. लार्सेन टूब्रो आणि जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस्ला चांगली कामे मिळतील. त्यामुळे लार्सन टूब्रो 1700 रुपयाला तर जे कुमार 152 रुपयाला घेण्यासारखा आहे. जे कुमारचे किं/ऊ गुणोत्तर सध्याच्या भावाला फक्त 6.54  पट आहे. रोज सुमारे 2 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. 

महिनाअखेर केंद्रसरकार लोखंड व  पोलादाबाबत काही घोषणा करणार आहे. त्यामुळे जे एस डब्ल्यू स्टील हा शेअर JSW 266 रुपयाला घेण्यासारखा आहे. वर्षभरात तो 350 रुपयावर जावा. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर 8.45 पट आहे. रोज सुमारे 40 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. 

अर्थसंकल्पात आशादायक जरी काहीही नसले तरी काही कंपन्या आपल्या मूलभूत सामर्थ्यावर वाढतच असतात. आता परदेशी गुंतवणूकदारांना इथे गुंतवणुकीसाठी जास्त सवलती दिल्यामुळे काही कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वर जातील. 

स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ अ‍ॅश्युरन्स, एच डी एफ सी बँक, आर बी एल बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स अजूनही वाढतील. बजाज फायनान्स डिसेंबर अखेरपर्यंत 500 ते 700 रुपयांनी वाढावा.

अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल व डिझेलचे भाव जरी वाढवलेले असले तरी  पेट्रोल उत्पादक ओ एन जी सीला किंवा पेट्रोल वितरण करणार्‍या भारत  पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांना त्याचा काही फायदा होईल असे नाही. त्यामुळे सध्या त्यात गुंतवणूक करण्याची आवश्यकता वाटत नाही. 

नॉन  बँकिंग  फिनान्शिअल  कंपन्यांना द्रवता वाढवण्यासाठी सध्या चांगली संधी आहे. MAS  फिनान्शिअल सर्व्हिसेस, मुथुट फायनान्स, लार्सेन टूब्रो फिनान्शिअल सर्व्हिसेस, M & A फिनान्शिअल सर्व्हिसेस हे शेअर्स कसे वाढतात याकडे लक्ष द्यायला हवे.