Mon, Apr 12, 2021 03:24
अर्थवार्ता

Last Updated: Apr 04 2021 10:09PM

प्रीतम मांडके

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने अनुक्रमे 360.05 आणि 1021.33 अंकांची वाढ दर्शवून 14867.35 व 50029.83 अंकांच्या पातळीवर बंद भाव दिला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात अनुक्रमे 2.48 टक्के आणि 2.08 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्र सरकारकडून केवळ एकाच दिवसात मागे घेण्यात आला. व्याजदर कपाती संदर्भातील परिपत्रक हे ‘चुकून’ जारी करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवर स्पष्ट केले. यामुळे एप्रिल ते जून तिमाहीतील अल्पबचत योजनांचे व्यादर हे जानेवारी ते मार्च तिमाहीप्रमाणेच राहणार. 

कोरोनाच्या चक्रात भरडल्या गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काहीतरी दिलासादायक आकडेवारी. मार्च महिन्यात जीएसटीद्वारे केंद्र सरकारला आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी म्हणजे 1.24 लाख कोटींचा महसूल मिळाला. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत हा महसूल 27 टक्क्यांनी अधिक आहे. जीएसटीद्वारे मागील सलग सहा महिने दरमहा केंद्र सरकारला सरासरी 1 लाख कोटींपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामुळे केंद्र सरकारने राज्यांना अधिकचे 45 हजार कोटी रुपये राज्यांचा वाटा म्हणून प्रदान केले. 

भारताची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत मार्च महिन्यात 58 टक्क्यांनी वधारून विक्रमी अशा 34 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. तसेच आयात 53 टक्क्यांनी वधारून 48.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे आयात आणि निर्यात यांच्यातील तफावत दर्शवणारी व्यापारतूट 14.1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

कोरोनामुळे सुमारे 4-6 महिने अख्खा देश लॉकडाऊन असूनदेखील केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्रालयाची चमकदार कामगिरी. आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये दरदिवशी 37 किलोमीटरच्या सरासरीने एकूण 13394 किलोमीटर्सच्या महामार्ग बांधणीचे वर्षभरात पूर्ण याच खात्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘दिल्ली-मुंबई महामार्ग’साठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय)ने तब्बल 9731 कोटी रुपये उभे केले. यासाठी सर्वाधिक रक्कम म्हणजेच 56 हजार कोटी हे एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाने पुरवले. या महामार्गाची एकूण लांबी 1276 कि. मी. आहे.

मायकोटेक डेव्हलपर्स (पूर्वाश्रमीचे लोढा डेव्हल्पर्स)चा आयपीओ 7 एप्रिल रोजी खुला होऊन 9 एप्रिल रोजी बंद होणार. एकूण 2500 कोटी किमतीचा हा आयपीओ असून याचा किंमत पट्टा 483-486 रुपये प्रतिसमभाग ठेवण्यात आला आहे. यापूर्वी लोढा बिल्डर्स डेव्हलपर्सकडून 2 वेळा (2010 साली आणि 2018 साली) आयपीओ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु बाजाराच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे हा प्रस्ताव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता.

देशभरात आर्थिक मंदीचे वातावरण असले तरी म्युच्युअल फंड एसआयपीला सुगीचे दिवस. देशातील सर्व म्युच्युअल फंड घराण्यांकडे मिळून एसआयपी मालमत्तेने 4 लाख कोटींचा आकडा पार केला. बाजारात चढउताराचा फायदा घेण्यासाठी आणि एकरकमी गुंतवणुकीपेक्षा दरमहा गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे.

देशातील महत्त्वाची आयटी कंपनी ‘विप्रो’ ऑस्ट्रेलियाची ‘अ‍ॅपिअन’ नावाची आयटी कंपनी विकत घेणार. एकूण 117 दशलक्ष डॉलर्सचा व्यवहार होण्याची शक्यता आहे. जूनअखेर हा व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘जो-बायडन’ यांनी अमेरिकेतील पायाभूत सुविधा उभारणीसाठी तब्बल 2 ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले.
मार्च महिन्यात यूपीआयद्वारे होणार्‍या व्यवहाराच्या मूल्यात मागील महिन्याच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढ होऊन यूपीआयद्वारे एकूण 5.05 लाख कोटींचे व्यवहार करण्यात आले. 
26 मार्च रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 2.986 अब्ज डॉलर्सनी घटून 589.285 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.