Sun, Jan 17, 2021 12:33
मार्केट वाढले; काय करावे ?

Last Updated: Dec 13 2020 11:34PM
ज्यावेळी मार्केट महाग असते त्यावेळी गुंतवणूक केली, तर तिथे नंतरच्या दोन-तीन वर्षांमध्ये चांगला परतावा पाहायला मिळत नाही, असा अनुभव आहे. म्हणून सध्याचा बाजाराचा विचार केला असता तर मार्केट महाग दिसते.

जगात शाश्‍वत असं काहीच नसते हे एका विषाणूने संपूर्ण जगाला 2020 या वर्षात दाखवून दिले. हे वर्ष जगातील प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. खूप काही घटना आणि खूप काही शिकवण कोरोना महामारीने दिली. 2020 या वर्षाने सर्वांच्या लक्षात राहील असा इतिहास नोंदला गेला. असाच इतिहास शेअर मार्केटने गुंतवणूकदारांना दिलेला आहे. वर्षाच्या सुरुवातीस शेअर मार्केट (सेन्सेक्स) 42000 चा नवीन इतिहास नोंदला होता. मार्चमध्ये शेवटच्या आठवड्यात अनेक देशात कोरोनाचा फैलाव सुरू झाला आणि अवघ्या पंधरा दिवसांमध्ये 42 हजारांवरून 26 हजारपर्यंत मार्केट घसरले. 40% पडझड पाहायला मिळाली. गुंतवणूक दरांचे खूप मोठे नुकसान मोठे नुकसान झाले. परंतु परत एकदा या वर्षातच डिसेंबर अखेर भारतीय शेअर मार्केट एक नवीन उच्चांकी 46000 पर्यंत सेन्सेक्स ने मजल मारली. जितके नुकसान कोरोनामुळे शेअर मार्केटने या वर्षात केले होते, त्याहून अधिक फायदा गुंतवणूकदारांना मार्केटने याच वर्षात करून दिला आहे. या वर्षात वर्षाच्या सरतेशेवटी शेअर मार्केट नवनवीन उच्चांक करीत गेल्या 20 दिवसात सातत्याने मार्केट वाढ दिली आहे. गुंतवणूकदारांना भरभरून फायदा या भांडवली बाजाराने यावर्षी दिला आहे. कित्येक शेअरची किंमत मार्च-एप्रिल च्या तुलनेत दुप्पट तिप्पट झालेली पहायवयास मिळकतात. वैद्यकीय क्षेत्रातील म्युच्युअल फंड योजनांनी गेली पाच वर्षे काहीच परतावा दिला नव्हता, तो कोरोना महारामारीच्या प्रभावाने या क्षेत्रातील सीपमधील गुंतवणूक योजनांनी मागील पाच वर्षात 25% ते 30% हून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

आजही वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड मोठी उलाढाल चालू आहे. आज डिसेंबर अखेरीस मार्केट 46000 चा टप्पा पार केलेला आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे सर्वांचे पोर्टफोलिओ चांगले परतावे दिसत आहेत. सध्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे मूल्य 30 लाख कोटी पर्यंत पोहोचली आहे. हासुद्धा नवीन उच्चांक गाठला आहे. मार्केटचे निरीक्षण केल्यास आत्ताचे मार्केटचा पी ई रेशो पाहिल्यास मार्केट खूपच महाग आहे. सध्या सेन्सेक्स पी ई 33 आहे व निफ्टीचा पीई 37 इतका आहे. मागील तीस वर्षांचा निफ्टीचा पी ई रेशो किमान 10.86 आणि कमाल 29.90 इतका दर्शविला आहे. म्हणजेच आपल्या देशाचा निफ्टीचा सरासरी पी ई रेशो 19.90 इतका येतो. परंतु सध्याच्या काळात 37 पी ई म्हणजे खूपच महाग आहे. पी ई रेशो जितका जास्त तितके मार्केट महाग असते व गुंतवणुकीसाठी योग्य वेळ नसते कारण अशा वेळेत गुंतवणूक केली, तर नंतरच्या काळात परतावा चांगला मिळत नाही हा अनुभव आहे. अर्थात पी ई म्हणजे किमतीचे उत्पन्नाशी गुणोत्तरप्रमाणे होय. साधा भाषेत याचा अर्थ असा होतो की मला बाजारामधून गुंतवणुकीच्या माध्यमातून एक रुपया मिळविण्यासाठी किती रुपये गुंतवणूक करावी लागते, हे उत्तर कळते, जर बाजाराचा पी ई रेशो 15 असेल तर मला 1/- रु. गुंतवणूक करावी लागते. आजचा निफ्टीचा पी ई 37 आहे. म्हणजे तुम्हाला 1 रुपया मिळविण्यासाठी 37 रु. द्यावे लागत असतील तर आताचे मार्केट महाग आहे. हे समजते. आपले देशाचा निफ्टीचा पीई रेशो 37 आहे. तर अशावेळी  गुंतवणूक करताना विचार करावा लागतो. ज्यावेळी मार्केट महाग असते त्यावेळी इक्विटी मार्केटमधून बाहेर पडून नफा आपल्याला घेता आला पाहिजे. हे जरी खरे असले तर सध्याचे ग्लोबल मार्केटचे निरीक्षण केल्यास अमेरिकेचा पी ई हा 72 आहे आणि तिथे व्याजदर 1% ते 2% इतके आहेत. जपान सारख्या देशात उणे व्याजदर  आहेत. आपल्या देशात ही व्याजदर 5% पर्यंत आले आहेत. अशा देशातील पैसा आपल्यासारख्या अविकसनशील देशात गुंतविल्याशिवाय पर्याय राहत नाही. अशावेळी भांडवली बाजारामध्ये गुंतवणुकीशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून गेल्या दोन महिन्यात आपल्या देशात विदेशी गुंतवणूकदारांनी फार मोठी गुंतवणूक केलेली दिसून येत आहे. त्यामुळे देशात मंदी असूनही मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट वाढले आहे. त्याचबरोबर मार्केट कॅपिटल टू जीडीपी रेशो म्हणजेच भांडवली बाजार बाजारातील भांडवल आणि देशाचे उत्पन्न यांचे गुणोत्तर पाहिल्यास मार्चमध्ये 60 टक्केपर्यंत आले होते. सध्या 90 टक्केहून अधिक आहे. याच तुलनेत अमेरिकेचे गुणोत्तर पाहिल्यास 171 टक्केहून अधिक आहे. जेव्हा हा रेशो 70% पर्यंत असेल, तर गुंतवणुकीस योग्य वेळ आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. पण जसे जसे हे मार्केट कॅपिटल वाढत जाते तसे तसे गुंतवणूक करणे हे महागडे ठरत जाते. ज्यावेळी मार्केट महाग असेत त्यावेळी गुंतवणूक केली तर तिथे नंतरच्या दोन-तीन वर्षांमध्ये चांगला परतावा पाहायला मिळत नाही. असा अनुभव आहे. म्हणून सध्याचा बाजाराचा विचार केला असता तर मार्केट महाग दिसते. उच्च पातळीवर असलेने आपल्या पोर्टफोलिओमधून इक्विटीचे एक्स्पोजर कमी करून डेब्ट फंडात कमी करणे गरजेचे आहे. परत मार्केट खाली आले की परत इक्विटीचे एक्स्पोजर वाढविला तर चांगल्या प्रकारे परतावा मिळू शकेल. अशा वेळी गुंतवणूक करताना विविध मालमत्तेमध्ये गुंतवणूक असलेल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे उचित ठरते. 

(लेखक एस पी वेल्थ, कोल्हापूरचे प्रवर्तक आहेत)