Mon, Apr 12, 2021 02:29
गुंतवणूक आणि डिमॅट अकाऊंट

Last Updated: Apr 04 2021 10:20PM

अनिल पाटील

शेअर बाजार किंवा कमोडिटी बाजारातील गुंतवणूक म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मते हे मार्केट एक जुगार आहे. इथे पैसे बुडतात. शहाण्या व्यक्तीने दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण अशा मार्केटमध्ये गुंतवणूक करून जुगार खेळू नये. या एका विचाराचा आधार घेऊन आपल्या देशातील बहुसंख्य लोक या मार्केटपासून वंचित आहेत. फेब्रुवारी 2021 ला आपल्या देशातील 135 कोटी जनतेपैकी आज फक्त 5.15 कोटी डिमॅट अकाऊंट उघडली आहेत. कोरोना महामारी च्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे दीड कोटी डिमॅट अकाऊंट उघडली गेली आहेत. एकूण डिमॅटपैकी 25% टक्के खात्यांवर शेअर मार्केटबाबत खरेदी-विक्रीचे व्यवहार होताना दिसतात. 

शेअर मार्केटचा इतिहास पाहिल्यास 1 एप्रिल 1979 साली 100/- ने सुरू झालेला शेअर मार्केटचा सेन्सेक्स मार्च 2021 मध्ये 51, 000/- च्या टप्प्यात पोहोचला आहे. या चाळीस वर्षांचा एकूण सरासरी परतावा 16% ने मिळाला आहे. म्हणजेच या सेन्सेक्समध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेचे दर साडेचार वर्षात दुप्पट झाले आहेत. इतका चांगला परतावा इतर कोणत्याही मालमत्तेने दिलेला नाही. अगदी मूठभर लोकच या मार्केटमध्ये गुंतवणूक करून गर्भश्रीमंत झालेले पाहावयास मिळतात. परंतु जे काही लोकांनी पैसे मिळविले आहेत, काही अंशी त्यांनाही नुकसान सोसावे लागलेले आहे, हे खरे आहे. 

सर्वसामान्य, बहुसंख्य लोकांचे पैसे बुडाले आहेत. या कारणांचा शोध घेतला तर खालील कारणे पाहावयास मिळतात... मार्केटबाबत अर्धवट ज्ञान घेऊन गुंतवणूक केली जाते. दुसरे म्हणजे अल्पकाळात मोठा फायदा मिळविण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केली जाते, किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून शेअर घेतला जातो. नंतर तो खाली येतो आणि नुकसान होते. याचा अर्थ म्हणजे तुम्ही गाडी चालविण्याचे ज्ञान न घेता तुम्ही जर गाडी घेऊन रस्त्यावर गेलात तर निश्चितच तुमचा अपघात होणार आणि नुकसान सोसावे लागणार. 

तुम्हाला या मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला मार्केटबाबत ज्ञान घ्यावे लागेल. मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतो, त्या कंपनीची इत्यंभूत माहिती घेतली पाहिजे. त्या कंपनीचा व्यवसाय काय आहे?  त्या व्यवसायाला भविष्यात मागणी आहे का? त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल किती आहे? त्या कंपनीचा ईपीएस किती आहे? त्या कंपनीचा पीई रेशो किती आहे? पीईजी रेषो कसा आहे? आरओसी रेषो काय आहे? प्रमोटर होल्डिंग किती आहे? कंपनीत मालमत्तेशी कर्जाचे प्रमाण किती आहे? सातत्याने ती कंपनी नफा कमवीत आहे का? अनेक गोष्टी आपणास माहिती करून घेणे गरजेचे असते. या बेसिक गोष्टींची माहिती करून घ्यावी. मगच त्या कंपनीत गुंतवणूक करावी.

आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करतो म्हणजे एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करतो. तो व्यवसाय जसा वाढेल तसा आपला शेअर वाढत असतो. त्यासाठी ती कंपनी वाढण्यासाठी तुम्हाला वेळ देणे गरजेचे असते. आपल्या देशातील पहिल्या 50 कंपन्यांचा मागील 25 वर्षांचा इतिहास पाहिल्यास सरासरी 18 ते 26% नी वाढलेले दिसतात. अशा ठिकाणी गुंतवणूक केलेले लोक करोडपती झालेले दिसतात.

खरे तर या क्षेत्रातील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी असते, हे अनेकांना लक्षात येत नाही. बरेच लोक पारंपरिक विमा योजना 20 ते 25 वर्षांसाठी घेतात. त्याच्याकडे कधी पाहतही नाहीत.जिथे 5 ते 6% परतावा मिळतो, जिथे तुमची रक्कम दामदुप्पट होण्यासाठी 12 ते 14 वर्षे लागतात. म्हणजे आजचे 10,000/- रु. चे मूल्य 25 वर्षांत 42,400/- होते आणि शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर दोन-तीन वर्षात वाढला नाही म्हणून लगेच विकले जाते. गुंतवणूकदारांची ही मानसिकता चुकीची दिसून येते. 

जर तुम्ही शेअरमार्केटमधील गुंतवणुकीसाठी दीर्घ काळ दिला; तर किमान 15% व कमाल 25% पर्यंत परतावा मिळला, तर इथे चार ते सहा वर्षांत रक्कम दुप्पट होते. म्हणजे आज 10,000/- रु. शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक 25 वर्षांत 320,000/- इतकी होते. हा खरा संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग आहे आणि सर्वसामान्य लोकांनी ते अवलंबिले पाहिजे. 

शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करताना सेबी मान्यता ब्रोकरकडे तुमचे डिमॅट अकाऊंट काढावे लागते. केवायसीची पूर्तता केल्यानंतर डिमॅट अकाऊंट तुमच्या नावाने काढले जाते. आपल्या खाते नंबरची माहिती कुटुंबामध्ये सर्वांना द्या. सदर डिमॅट अकाऊंट खात्यामध्ये वारस नेमणूक करा. ज्या वेळी तुमचे डिमॅट अकाऊंट उघडले जाते, त्या वेळी तुम्ही ब्रोकरच्या नावाने किती रक्कम गुंतवणूक करायची आहे, तितक्या रकमेचा चेक द्यावा लागतो. तुमच्या खात्यामधून चेक वटून गेल्यानंतर तुमच्या डिमॅट अकाऊंटच्या पूल अकाऊंटमध्ये ही रक्कम जमा होते. ब्रोकरने तुमच्या खात्यामध्ये जमा केलेली रक्कम दिसते. त्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीचा शेअर्स आपल्या डिमॅट खात्यावरून खरेदी किंवा विक्री करू शकता. ज्या ज्या वेळी ब्रोकरकडे तुम्ही चेक देता त्या त्या वेळी ती रक्कम तुमच्या पूल अकाऊंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा नाहीत, याची खात्री करून घेतली पाहिजे. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील, तर लगेच तक्रार केली पाहिजे. जर तुमच्या ब्रोकरने तक्रारीची नोंद घेतली नाही, तर तुम्ही सेबीकडे तक्रार करू शकता. एखादा ब्रोकर तुमचे डिमॅट अकाऊंट न करता तुमच्या नावाने शेअर्स घेऊन देतो किंवा तुम्हाला दर महिन्याला फायदा मिळवून देतो, असे सांगून तुमची गुंतवणूक घेत असेल तर हे तुमच्या द़ृष्टीने फारच धोकादायक आहे. तुमची फसवणूक होत आहे, हे लक्षात आले पाहिजे.

कोणत्याही ब्रोकरला तुमच्याकडून डीमॅट खाते न काढता तुमची गुंतवणूक घेऊन त्यांच्यावतीने शेअर मार्केट किंवा कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करून घेण्याचा अधिकार नाही, हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. अशा गोष्टीला सेबीची मान्यता नसते. जर तुम्हाला दीर्घकाळात चांगला परतावा हवा असेल, तर स्वतःच्या नावाने डिमॅट अकाऊंट काढा. मार्केटचा चांगला अभ्यास करा. मगच गुंतवणूक करा. असा अभ्यास करायचा नसेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड पर्याय आहेच. आपल्या भविष्यातील गरजेनुसार चांगल्या योजना  काळजीपूर्वक वाचून गुंतवणूक करू शकता. 
(प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर)