होमपेज › Arthabhan › अर्थवार्ता

अर्थवार्ता

Last Updated: Nov 04 2019 1:06AM
प्रीतम मांडके

गतसप्‍ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने अनुक्रमे एकूण 263.45 आणि 878.85 अंकांची वाढ दर्शवून 11890.6 व 40129.05 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे 2.27 टक्के आणि 2.24 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 

सरकारी क्षेत्रातील दिग्गज ‘बँक ऑफ इंडिया’चा चालू आर्थिक वर्षाचा दुसर्‍या तिमाहीचा नफा 266.3 कोटींवर आला. मागील वर्षी हा नफा 1156 कोटी होता. त्याचप्रमाणे निव्वळ व्याज उत्पन्‍न (नेट इंटरेस्ट इनकम) मागील वर्षी असणार्‍या 2927 कोटींच्या तुलनेत 3860 कोटी झाली. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 16.36 तक्क्यांवरून 16.31 टक्क्यांवर खाली आहे. 
  ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा कराद्वारे मिळणार महसूल (जीएसटी कलेक्शन) मागील वर्षीच्या तुलनेत 5.29 टक्के घटून 95380 कोटी झाला. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात जीएसटीद्वारे मिळणारा महसूल 1 लाख 710 कोटी होता. 

ऑनलाईन वस्तू विक्री क्षेत्रात कार्यरत असणार्‍या फ्लीपकार्टची विक्री आर्थिक वर्ष 2019 मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 42 टक्के वधारून 43615 कोटींवर पोहोचली. तसेच फ्लीपकार्ट उद्योग समूहाचा तोटा 6.3 टक्क्यांपर्यंत घटून 17231 कोटी झाला. 

सुप्रीम कोर्टाने ‘एजीआर’संबंधी दिलेल्या निकालाने एअरटेल व्होडाफोन आयडिया यासारख्या जुन्या दूरसंचार कंपन्या अडचणीत. निकालाचे पालन करायचे झाल्यास दूरसंचार कंपन्यांना 1.42 लाख कोटींची थकबाकी सरकारकडे जमा करावी लागणार. एअरटेलला 42 हजार कोटी, व्होडाफोन आयडियाला 40 हजार कोटी नियमानुसार द्यावे लागतील. याप्रकरणी मध्यम मार्ग काढण्याची दूरसंचार कंपन्यांची सरकारला विनंती. परंतु रिलायन्स जिओ कंपनीने यावर टीका केली. जुन्या दूरसंचार कंपन्या हा निधी देण्यास सक्षम असून त्यांच्याकडून तो वसूल करण्यात यावा, असे पत्रक काढले. अप्रत्यक्षरीत्या जिओ कंपनीने प्रतिस्पर्धी एअरटेल व व्होडाफोन-आयडियावर निशाणा साधला. 

येस बँकमध्ये ‘नॉर्थ अमेरिकन फॅमिली ऑफिस’ उद्योग समूह 1.2 अब्ज डॉलर्स (सुमारे 8400 कोटी रुपये) ची गुंतवणूक करण्यास उत्सुक. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत येस बँकेचा तोटा 600.08 कोटींवर पोहोचला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्‍न (नेट इंटरेस्ट इनकम) 2186 कोटी झाले. तसेच एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण मागील तिमाहीत असणार्‍या 5.01 टक्क्यांच्या तुलनेत दुसर्‍या तिमाहीत 7.39 टक्क्यांवर पोहोचले. आर्थिक संकटांशी मुकाबला करणार्‍या येस बँकेमध्ये परदेशी गुंतवणुकीची बातमी येताच समभागाने सुमारे 21 टक्क्यांची उसळी दर्शवली. 

टाटा ट्रस्टशी निगडित 6 संस्थांची नोंदणी प्राप्‍तिकार विभागाकडून रद्द. 2015 साली स्वेच्छेने जमशेदजी टाटा, आरडीटाटा, टाटा एज्युकेशन ट्रस्ट, टाटा सोशल वेल्फेअर ट्रस्ट, सार्वजनिक सेवा ट्रस्ट व नवाजबाई रतनटाटा यांनी आपली नोंदणी प्रत्यर्पित केली (सरेंडर) होती. परंतु तरीदेखील प्राप्‍तिकार विभागाकडून करवसुलीची नोटीस या संस्थांना धाडण्यात आली. या नोटीसीला टाटा समूह आव्हान देण्याच्या तयारीत असल्याने प्राप्‍तिकर विभागाने या प्रकरणावर पडदा टाकला. 

दक्षिण आफ्रिकेचा ‘सनलॅम’ उद्योग समूह श्रीराम कॅपिटलमधील 8 टक्के हिस्सा खरेदीस उत्सुक. यासंबंधी सनलॅम उद्योग समूहाची अजय पिरामल यांच्यासोबत चर्चा. श्रीराम फायनान्शिअल सर्व्हिसेसमधील श्रीराम कॅपिटल ही प्रमुख कंपनी असून याचे बाजारमूल्य 17 ते 18 हजार कोटींदरम्यान आहे. सुमारे 1360 कोटींची हिस्साविक्री होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज.

‘कॅग्‍निझंट’ या आयटी कंपनीतील 13 हजार कर्मचार्‍यांचे रोजगार धोक्यात. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यावरील खर्चामध्ये कपात करण्यासाठी पुढील काही तिमाहींमध्ये 7000 कर्मचारी सेवेतून कमी करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट.

पीएमसी बँकेच्या खातेदारांना काही प्रमाणात दिलासा- पीएमसी बँकेच्या 3500 कोटींच्या मालमत्तेवर आरबीआय टाच आणणार. मालमत्ता विक्रीद्वारे खातेदारांचे पैसे परत करण्याचा रिझर्व्ह बँकेचा मानस. सध्या बँकेत 11 हजार कोटींच्या ठेवी. 

इंडिगो ही हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपनी तब्बल 300 नवी विमाने विकत घेणार. एअरबस या विमान बनवणार्‍या कंपनीला हे कंत्राट मिळाले असून इंडिगो आणि एअरबसमध्ये 33 अब्ज डॉलर्सचा व्यवहार होणार. 

 25 ऑक्टोबर रोजी संपलेल्या सप्‍ताहाअखेर भारताची परकीय गंगाजळी 1.832 अब्ज डॉलर्सनी वधारून विक्रमी अशा 442.583 अब्ज डॉलर्सच्या पातळीवर पोहोचली. 
(मांडके फिनकॉर्प)