Sat, Feb 27, 2021 06:31
क्रेडिट कार्डने कर्ज घेताय? 

Last Updated: Feb 22 2021 8:20AM

सुभाष वैद्य

पूर्वी कर्ज घेण्यासाठी नागरिकांना बराच आटापिटा करावा लागत असे. नोकरदार, व्यावसायिक असेल तर प्रत्येकासाठी वेगळे निकष. त्याचबरोबर बँकेकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा व्हायचा. अलीकडच्या काळात आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन आणि क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने होऊ लागल्याने कर्जाचे स्वरूपही बदलले. कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आला. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हे केवळ खर्चासाठी नाही, तर कर्ज मिळवण्यासाठीचे आणखी एक साधन ठरू लागले आहे. क्रेडिट कार्डने कर्ज घेण्याबाबत जेव्हा विचार होतो; तेव्हा त्याची अन्य कर्जाशी तुलना केली जाते. साधारणपणे क्रेडिट कार्डच्या कर्जाची तुलना वैयक्तिक कर्जाशी केली जाते. या दोन्हींपैकी कोणते कर्ज फायद्याचे आहे, हे जाणून घेऊ. 

डिट कार्ड वापरणार्‍या मंडळींना क्रेडिट कार्डवर मिळणार्‍या कर्जाची माहिती असते. विशेष म्हणजे आपत्कालीन स्थितीत कर्ज सहजासहजी मिळावे, यासाठी देखील काही मंडळी क्रेडिट कार्ड घेतात. आपणही कर्ज घेण्याच्या उद्देशाने क्रेडिट कार्ड घेत असाल तर या गोष्टी फायद्याच्या आहेत की नाही, हे जाणून घ्यायला हवे. इथे वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जाची तुलना करूया आणि या आधारावर कोणते कर्ज उपयुक्त आहे, हे देखील समजण्यास मदत मिळेल. 

व्याजदरात पसर्र्नल लोन उपयुक्त 

दीर्घकाळासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर क्रेडिट कार्ड लोन महागडे ठरू शकते. क्रेडिट कार्डवर साधारणपणे 12 टक्क्यांपेक्षा अधिक दराने कर्ज मिळते. काही वेळा स्पेशल ऑफरनुसार 11 टक्के दराने देखील कर्ज मिळू शकते. मात्र त्यापेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळू शकत नाही. आपण वैयक्तिक कर्ज घेतल्यास आपल्याला 10 किंवा 10.50 टक्के दरापर्यंतच्या व्याजदराने कर्ज मिळू शकते. मात्र यासाठी सिबील स्कोर आणि बँकेत रेकॉर्ड चांगले असणे आवश्यक आहे. दीर्घकाळासाठी पर्सनल लोन चांगले आहे. यादरम्यान आपण बँकेशी चर्चा करून व्याजदर कमी करून घेऊ शकता. जर बँकेने आपले म्हणणे मान्य केल्यास कमी व्याजदरातही मोठे कर्ज मिळू शकते. 

क्रेडिट कार्डने लवकर कर्ज मिळते

कर्जाची रक्कम अधिक नसेल तर आपण क्रेडिट कार्डने काही मिनिटात कर्ज घेऊ शकता. क्रेडिट कार्डचे कर्ज दोन प्रकारे मिळते. एक तर क्रेडिट लिमीट ब्लॉक करून आणि दुसरे म्हणजे क्रेडिट लिमीटव्यतिरिक्त मिळणारे कर्ज. वैयक्तिक कर्ज घेण्याची इच्छा बाळगून असाल तर बहुतांश बँकेच्या नियमानुसार सोपस्कार पार पाडावे लागतात. यामुळे कर्ज मिळण्यात आपल्याला पाच ते सात दिवस लागू शकतात. काही बँकांकडून कर्जाची प्रक्रिया लवकर होते. परंतु क्रेडिट कार्डप्रमाणे तातडीने कर्ज मिळू शकत नाही. कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ती रक्कम आपल्या खात्यात वर्ग होते. 

क्रेडिट कार्डवर प्री-अप्रूव्ड कर्ज

बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेताना केवायसीची प्रक्रिया पार पाडावी लागते. या आधारावर बँक आपल्या उत्पन्नाची पडताळणी करते. त्याचवेळी क्रेडिट कार्डवर मिळणारे लोन हे क्रेडिट स्कोरच्या आधारावर असते. क्रेडिट कार्डच्या वापराच्या आधारावर बँकांकडून देखील प्री-अप्रूव्हड कर्जाची ऑफर देण्यात येते. ऑफरच्या रकमेपर्यंत कर्ज घेता येऊ शकते. या प्रक्रियेत आपल्याला कोणतेही कागदपत्रे बाळगण्याची आणि देण्याची गरज भासत नाही. 

प्री-क्लोज्डसाठी क्रेडिट कार्ड फायद्याचे 

जर आपल्या मुदतीपूर्वीच कर्ज खाते बंद करायचे असेल, तर क्रेडिट कार्डने कर्ज घेणे फायद्याचे ठरू शकते. पर्सनल लोन प्रिक्लोज करायचे असेल तर बहुतांश बँकांत ऑनलाइन प्री-क्लोजिंगची सुविधा दिली जात नाही. मोठ्या खासगी बँकेतदेखील कर्ज खाते बंद करण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागते. त्याचवेळी क्रेडिट कार्डने घेतलेले कर्ज काही मिनिटात ऑनलाइनवर बंद करू शकतो. अर्थात काही बँकांनी प्री क्लोज करण्यासाठी काही मर्यादा निश्चित केली आहे. जसे की तीन महिने, 6 महिने किंवा एक वर्ष. त्याचवेळी काही बँकांकडून केव्हाही कर्ज बंद करण्याची सुविधा असतेे. लक्षात ठेवा, मुदतपूर्व कर्ज खाते बंद करताना काही शुल्कदेखील भरावे लागू शकते. हे शुल्क शिल्लक मुद्दलावर आकारले जाते. मात्र त्यावरील व्याज भरण्याची गरज भासत नाही. 

कोणते कर्ज फायद्याचे?

सारांशाने विचार करता, क्रेडिट कार्डने कर्ज घेणे हा फायद्याचा सौदा ठरू शकतो. मात्र कार्डवर अधिक कर्ज मिळू शकत नाही. पण कर्जाशी निगडित अनेक सुविधा आपल्याला मिळू शकतात. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड लोनसाठी आपल्याला कोठेही जाण्याची गरज नाही आणि कागदपत्रेही जमा करण्याची आवश्यकता भासत नाही. व्याजाच्या बाबतीत पर्सनल लोनचा फायदा होतो. परंतु तो खूपच किरकोळ असतो.