Sat, Aug 08, 2020 13:57होमपेज › Ahamadnagar › अंधश्रद्धेतून झाला देवस्थानप्रमुखाचा खून!

अंधश्रद्धेतून झाला देवस्थानप्रमुखाचा खून!

Published On: Mar 04 2019 1:04AM | Last Updated: Mar 04 2019 12:19AM
नगर / नान्नज : प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील शिकारेवस्ती येथील दत्त देवस्थानच्या प्रमुखाचा शनिवारी (दि. 2) रात्री अंधश्रद्धेतून धारदार चाकूने निर्घृण खून करण्यात आला. रविवारी पहाटे ‘रक्षा’ हा श्‍वान माग काढून पोलिसांना उसाच्या शेतात आरोपीपर्यंत घेऊन गेला. स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने शंकर सोपान शिकारे (वय 25, रा. शिकारेवस्ती, बाळगव्हाण, ता. जामखेड) यास ताब्यात घेतले आहे. आरोपी जखमी असल्याने त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुशाबा तुळशीराम शिकारे (वय 50,  शिकारे वस्ती, बाळगव्हाण, ता. जाखमेड) हे मयताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मयत कुशाबा शिकारे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिकारे वस्तीवरील घराजवळ असणार्‍या दत्त मंदिरात होते. तेथे अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. कुशाबा शिकारे यांना तात्काळ खर्डा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात  आले होते. तेथून  जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ते मयत असल्याचे सांगितले.

देवस्थानप्रमुखाच्या घटनेने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जामखेड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने आरोपीचा शोध लावण्याचे आदेश दिले होते. श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. रात्रीच जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथकांनी चौकशी सुरू केली. गावातीलच एकावर संशय बळावला. तो घरी आढळून आला नाही. पहाटेच्या सुमारास श्‍वानपथकाचे उपनिरीक्षक एस. डी. वाबळे हे  ‘रक्षा’ हा श्‍वान घेऊन दाखल झाले. श्‍वानाने घटनास्थळाचा वास घेऊन आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलिसांचे पथक श्‍वानामागे जाऊ लागले. साडेतीन किलोमीटर अंतरावर शेतामध्ये आरोपी शंकर शिकारे हा जखमी अवस्थेत आढळून आला. 

आरोपी शिकारे याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तो म्हणाला की, कुशाबा शिकारे यांच्याकडे दुखणे बरे करण्यासाठी जात होतो. मात्र दुखणे बरे होण्यापेक्षा वाढत चालले.  तसेच  दहा-बारा वर्षांपूवी  माझे आजोबा  करणी करत होते, असे कुशाबा शिकारे लोकांना सांगत होता. त्यामुळेच माझ्या आजोबाने फाशी घेवून जीवनयात्रा संपवली, असे सांगितले. शंकर शिकारे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणले होते. तेथून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील  ससून  रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मयताची पत्नी रेखा कुशाबा शिकारे यांच्या फिर्यादीवरून शंकर सोपान शिकारे याच्याविरुद्ध जामखेड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह  कर्मचारी बापूसाहेब गव्हाणे, नवनाथ भिताडे आदींसह जामखेड व एलसीबीच्या पथकानेही मेहनत घेतली.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी शंकर शिकार याने त्याच्या डाव्या हातावर वार करून  घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात हलविले. त्यामुळे तो बचाविला.