Tue, Aug 04, 2020 10:44होमपेज › Ahamadnagar › लोकसभेसाठी आजपासून प्रशिक्षण

लोकसभेसाठी आजपासून प्रशिक्षण

Published On: Feb 11 2019 1:15AM | Last Updated: Feb 11 2019 12:06AM
नगर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील  दोन्ही मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी औरंगाबाद येथे आजपासून (सोमवार) चार दिवस निवडणूक विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व अकरा उपजिल्हाधिकारी जाणार आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदान यंत्रांची अदलाबदल, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम भारत निवडणूक आयोगाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. नगर दक्षिण मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. शिर्डी मतदारसंघासाठी अपर जिल्हाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्‍ती केली जाते. सध्या या पदावर जिल्ह्यातील  रहिवासी भानुदास पालवे हे कार्यरत आहेत. त्यांची लवकरच बदली होणार आहे. त्यांच्या जागेवर बदलून येणारे अधिकारीच शिर्डी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. 

जिल्ह्यातील एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. या प्रत्येक मतदारसंघात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, म्हणून कामकाज पाहणार आहेत. त्यांच्या नियुक्त्या देखील केल्या गेल्या आहेत. उपजिल्हाधिकारी वामन कदम यांची अकोले मतदारसंघासाठी, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे यांची संगमनेर, शिर्डी उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे यांची शिर्डी, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांची कोपरगाव, श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची श्रीरामपूर, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांची नेवासा, पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची शेवगाव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे यांची राहुरी, उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांची पारनेर, नगरच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची नगर, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांची श्रीगोंदा, तर उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे  यांची जामखेड-कर्जत मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आजमितीस नियुक्‍ती केली गेली आहे. सरकारने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बदलीपात्र अधिकार्‍यांच्या बदल्या केल्यास, रिक्‍त जागेवर बदलून आलेल्या अधिकार्‍यांची नियुक्‍ती होणार आहे.

या अधिकार्‍यांसाठी औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे 11 ते 14 फेब्रुवारी असे चार दिवस निवासी प्रशिक्षण आयोजित केले आहे. भारत निवडणूक आयोगाचे प्रशिक्षक या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये प्रशिक्षक उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांचा देखील समावेश आहे.