Tue, Aug 04, 2020 11:08होमपेज › Ahamadnagar › लष्करी हद्दीत तिघांची घुसखोरी!

लष्करी हद्दीत तिघांची घुसखोरी!

Published On: Jan 05 2019 2:12AM | Last Updated: Jan 05 2019 12:24AM
नगर : प्रतिनिधी

लष्कराच्या एसीसी स्कूल अँड आर्मड् याच्या हद्दीत घुसखोरी करणार्‍या तिघांना लष्करी जवान व अधिकार्‍यांनी पकडून त्यांना गुरुवारी रात्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 4) दुपारी न्यायालयासमोर हजर केले. सखोल चौकशीसाठी त्यांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अटक केलेल्यांमध्ये प्रदीप सीताराम शिंदे (रा. पारनेर), रिजवान एजाज अली, सोनू नवाजुद्दीन चौधरी (दोघे रा. शहापूर, जि. मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. अटक केलेल्या प्रदीप शिंदे या युवकाच्या अंगावर लष्कराचा गणवेश, बनावट ओळखपत्र व आर्मीचे मानचिन्ह होते.

गुरुवारी दुपारी एसीसी सेंटर येथील त्रिशूल चौकात सुभेदार व हवालदार बंदोबस्तास होते. त्यावेळी दोन दुचाकींवर तीन इसम संशयितरीत्या फिरताना आढळून आले. त्यातील एकाच्या अंगावर आर्मीचा सरकारी गणवेश होता. तिघांना थांबवून विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एकाकडे बनावट ओळखपत्र सापडले. त्यामुळे लष्करी जवान व अधिकार्‍यांचा त्यांच्यावरचा संशय अधिक बळावला.

त्यांनी हद्दीत का प्रवेश केला, याचे समाधानकारक उत्तर संबंधितांना देता आला नाही. दोन जण उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर व एक नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना गुरुवारी रात्री उशिरा कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी सुभेदार भूपेंदर सिंग यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध शासकीय सेवक असल्याची बतावणी करून लष्कराच्या हद्दीत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

‘एटीएस’कडूनही चौकशी

या घटनेबाबत जिल्हा पोलिसांसह दहशतवादविरोधी विभागाकडूनही अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. मुंबई व नाशिक येथील पथके नगरला दाखल झालेली आहेत. शिंदे हा घरी लष्करात भरती झाले असल्याचे सांगून दोन वर्षांपासून बाहेर राहत होता, अशी माहिती चौकशीतून पुढे आलेली आहे.