Wed, May 19, 2021 04:51
रोहित पवारांनी सुजय विखे पाटलांच्या मतदार संघात उभारले ३०० बेडचे कोविड सेंटर

Last Updated: May 01 2021 4:10PM

अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 'साखरपेरणी' सुरू केली आहे. कर्जत जामखेडसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा जिल्हा रुग्णालयावर पडणारा भार लक्षात घेऊन त्यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून येथील पोलिस परेड ग्राऊंडवर ३०० बेडच्या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. लवकरच रुग्णांसाठी हे कोविड सेंटर उपलब्ध होणार आहे. या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. 

अधिक वाचा : नगर : खासदार सुजय विखेंच्या अडचणी वाढल्या

आ. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये प्रशस्त व सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारून नागरिकांच्या आरोग्य सुविधेची सोय केली आहे. जवळपास दोन हजार खाटांची क्षमता असणाऱ्या या कोविड सेंटरमधील रुग्ण चांगले उपचार घेऊन लवकर बरेही होत आहेत. दरम्यान कर्जत जामखेडसह जिल्हातील विविध तालुक्यातील  रुग्ण हे उपचारासाठी अहमदनरमधील रुग्णालयातही दाखल होत आहेत. परिणामी येथील आरोग्य सुविधेवर ताण पडू नये म्हणून पर्यायी व्यवस्था म्हणून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, अहमदनगर महापालिका व सार्वजनिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगरमधील पोलिस परेड ग्राऊंड येथे कोविड सेंटर उभे करण्यात आले. प्रशस्त व सुसज्ज असे सर्व सुविधांनीयुक्त हे कोविड सेंटर असून या येथे ३०० खाटा असणार आहेत. तर येथील काही खाटा या ऑक्सीजन सुविधेसह असणार आहेत.

अधिक वाचा : मोफत कोरोना लसीकरणासाठी काँग्रेसकडून राज्यात मदतीचा 'हात'!

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून डॉक्टर सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. तर रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात कोविड सेंटरची उभारणी केली असताना आता नगर शहरात कोविड सेंटर उभारून त्यांनी पुढील तयारी तर सुरु केली तर नाही ना? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.