Tue, Sep 29, 2020 08:35होमपेज › Ahamadnagar › कोरोना योद्ध्यांचा सर्वांना अभिमान : मुश्रीफ

कोरोना योद्ध्यांचा सर्वांना अभिमान : मुश्रीफ

Last Updated: Aug 17 2020 1:11AM
नगर : पुढारी वृत्तसेवा

अडचणीच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे कोरोना सारख्या आजाराचा मुकाबला करताना आपण एकत्रितपणे त्याला सामोरे जात आहोत. या संकटाचा अहोरात्र सामना करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस, सर्व आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणेतील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस प्रमुख अखिलेश कुमार सिंह, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, स्वातंत्र्यसैनिकांच्या अखंड प्रयत्नातून आणि बलिदानातून स्वातंत्र्याचा सूर्य आपल्याला पाहायला मिळाला. या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, देशासाठी सर्वस्व ओवाळून दिलेली प्राणाची आहूती यांचे कायम स्मरण आपणाला राहिले पाहिजे. सर्वधर्मसमभाव आणि विविधतेतील एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य राहिले आहे. लोकशाही मूल्यांवर आधारित आपली व्यवस्था हे आपले बलस्थान आहे. येथील प्रत्येकाला एक नागरिक म्हणून मिळालेले अधिकार आणि कर्तव्य यांचे पालन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.

आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांचे योगदान राहिले. विविध क्षेत्रात आपल्या देशाने गगनभरारी घेतली. जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून आपली नव्याने ओळख प्रस्थापित होत आहे. अशावेळी आपण एकजुटीने आपल्यासमोर असणार्‍या आव्हानांचा सामना केला पाहिजे, असे प्रतिपादन करुन ते म्हणाले की, सध्या कोरोना रुपी आजाराचा विळखा संपूर्ण जगाला सतावतो आहे. आपला देश, राज्य आणि जिल्ह्यातही त्याचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो आहे. त्याचा सामना करण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना योगदान देत आहेत. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वताचे आरोग्य जपले पाहिजे. हे संकट मोठे असले तरी आपण त्यातून निश्चितपणे बाहेर येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी पोलीस दलाच्या बॅंडपथकाने राष्ट्रगीत वाजविले तर पोलिस निरीक्षक हाटकर यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, उपजिल्हाधिकारी सर्वश्री जितेंद्र पाटील, सी. एस. देशमुख, पंकज चौबळ, पल्लवी निर्मळ, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि प्रांजली सोनवणे, तहसीलदार उमेश पाटील, वैशाली आव्हाड, गिरीष वखारे, शरद घोरपडे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी महेश शिंदे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी नकासकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 "