Tue, Sep 29, 2020 08:55होमपेज › Ahamadnagar › लग्नपत्रिकेतून प्रचार; तरुणावर गुन्हा दाखल

लग्नपत्रिकेतून प्रचार; तरुणावर गुन्हा दाखल

Published On: Apr 06 2019 1:43AM | Last Updated: Apr 07 2019 1:43AM
टाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

लग्नपत्रिकेद्वारे सुजय विखे यांचा प्रचार करणे निघोज येथील फिरोज शेख या उच्चशिक्षीत तरुणाला महागात पडले.  आहेर नको पण सुजय विखेंना मत द्या, असे आवाहन करणार्‍या फिरोज या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

फिरोजने केलेले हे कृत्य आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याने उपजिल्हाधिकारी पाटील, पारनेरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरते पथक अधिकारी शान मोहम्मंद शेख यांनी फिरोज याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिरोज यांचा विवाह 31 मार्च रोजी प्रवरानगर येथे पार पडला.या विवाहासाठी शेख यांनी छापलेल्या पत्रिकेमध्ये ‘किसी भी तरह का तोहफा मत दिजीए, मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ.सुजय विखे पाटीलजी को जरूर वोट दिजीए’ अशी विनंती करण्यात आली होती. या पत्रिकेची चांगलीच चर्चा रंगली होती. याची दखल घेत लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षातील अधिकार्‍यांनी चौकशी केली.चौकशीत आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्यात फिरोज याच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन फिरोजला अटक केली.  न्यायालयापुढे उभे केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.