Sat, Aug 08, 2020 14:15



होमपेज › Ahamadnagar › आघाडीचं काय कळंना..युतीचं काही जुळंना!

आघाडीचं काय कळंना..युतीचं काही जुळंना!

Published On: Nov 06 2018 12:40AM | Last Updated: Nov 05 2018 11:30PM



गोरख शिंदे
 

महापालिकेच्या निवडणुकीची तारीखही जाहीर झालीय. पुढच्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात होणार आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसची आघाडी अन् शिवसेना-भाजपाच्या युतीचं घोडं अजूनही अडलेलंच आहे. वरिष्ठ पातळीवरूनच निर्देश असल्यानं काँगे्रस अन् राष्ट्रवादीची आघाडी तर होणारच आहे. मात्र, त्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्रित बैठकीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. राष्ट्रवादीची धुरा दोन विद्यमान अन् एका माजी आमदारांकडं असल्यानं, पक्षानं प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यापासूनच जोरदार तयारी सुरू केलेली आहे. महापालिकेची सत्ता कोणत्याही परिस्थितीत मिळवायचीच, अशा पद्धतीने राष्ट्रवादीनं डावपेच आखल्याचे त्यांच्या रणनितीवरून दिसून येत आहे. तर दुसरीकडं कोतकरांनंतर काँगे्रसला शहरात भक्‍कम नेतृत्वच मिळालं नसल्यानं, पक्षाची अवस्था दोलायमान झालेली असून, अंतर्गत गटबाजीचे ग्रहणही तिला लागलेलं आहेच. त्यामुळं दोन्ही काँगे्रसमध्ये आघाडी झालीतरी सद्यस्थिती पाहता जागावाटपात राष्ट्रवादी काँगे्रसचाच वरचष्मा राहणार, हे निश्‍चित आहे. काँगे्रसचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या केडगावमध्ये प्रथमच निवडणूक ही कोतकरांशिवाय होणार आहे. कोतकरांच्या घरातील उमेदवारच या निवडणुकीत असणार नाही. त्यामुळं नेतृत्वाअभावी या ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुक असणार्‍यांना राष्ट्रवादीचाच आधार घ्यावा लागणार असल्याची एकंदरीत परिस्थिती आहे. आघाडीची ही परिस्थिती असताना  दुसरीकडं भाजपा अजनूही स्वबळाचेच नारे देत असल्यानं, शिवसेनेनंही ‘एकला चलो रे’चीच भूमिका घेतलेली पाहायला मिळतंय. जळगाव अन् सांगली महापालिकेच्या निकालांमुळं भाजपच्या एका गटाच्या स्थानिक नेतृत्वाला स्वबळावर परिवर्तन करण्याचं स्वप्न पडतयं. त्यामुळं शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वानंही स्वबळावरच लढण्याचे संकेत देत, आता युतीची वेळ टळून गेल्याचं सांगितलेलं आहे. मात्र, हे सांगतानाच काही प्रभागात युती होऊ शकते, असं सांगून संभ्रम कायम ठेवलेला आहे. युतीबाबत दोन्ही पक्षांत अद्याप कोणतीही चर्चा सुरू झालेली दिसून येत नाहीये. त्यामुळं ‘आघाडीचं काय कळंना.. युतीचं काही जुळंना’, अशीच सध्याची एकंदरीत परिस्थिती आहे.  

महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रसनं आमदार अरूणकाका जगताप, आ. संग्रामभैय्या जगताप अन् माजी आमदार दादाभाऊ कळमकर या सर्वाधिकार दिलेले आहेत. तर दुसरीकडं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अन् आ. बाळासाहेब थोरात यांच्या सहमतीनं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी युवक काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना महापालिका निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे सांगण्यात आलेलं आहे. पक्षीय पातळीवर राष्ट्रवादीकडून अंतर्गत जोरदार तयारी सुरू झालेली आहे. अनेक प्रभागांत त्यांची पॅनलही तयार झालेली असून, संबंधित उमेदवारांकडून प्रचारही सुरू झालेला आहे. राष्ट्रवादीनं इच्छुकांकडून 10 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्जही मागविले आहेत. तर दुसरीकडं काँगे्रसच्या पातळीवर अजूनही शांतताच दिसत आहे. मध्यंतरी काँगे्रसनंही प्रभाग बैठका घेऊन उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. मात्र, ही चाचपणीही आता थंडावल्याचे दिसतेय. वरवर विखे-थोरात गटांत दिलजमाई झाल्याचं चित्र दिसत असलं तरी, प्रत्यक्षात दुसर्‍या गटानं मुंबईतील बैठकीला मारलेल्या दांडीवरनं काँगे्रसमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दिसून येत नाहीये. त्यातही विखे गटाचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांच्यासाठी आघाडी करून राष्ट्रवादी आपली ताकद लावणार, हे निश्‍चित आहे. मात्र, थोरात गटाशी राष्ट्रवादीचं सूत फारसं जुळलेलंच नाही. मागील काळात महापौर निवडणूक, स्थायी समिती सभापती निवडणूक यामध्ये काँगे्रसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अन् नगरसेवक दीप चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेवरून, इंधन दरवाढीविरोधी मोर्चात आ. जगताप यांनी आपला राग व्यक्‍त केला होता. ‘निवडणुकीच्या निकालानंतर दुसर्‍यांच्या गाडीत बसणार्‍यांचं काय’, असा सवालच त्यांनी काँगे्रस नेतृत्वाला विचारला होता. त्यामुळं काँगे्रसच्या या गटाशी राष्ट्रवादी जमवून घेणार का, असा प्रश्‍न आहे. वरिष्ठ पातळीवर आघाडी होण्याचेच संकेत असले तरी, अद्याप दोन्ही काँगे्रसमध्ये चर्चाच सुरू झालेली नसल्यानं सध्यातरी आघाडीची गाडी वरवरच धावत असल्याचं दिसून येतय.

निवडणुकीसाठी भाजपानंही समन्वय समिती स्थापन केलेली असून, त्यामध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, खा दिलीप गांधी, अ‍ॅड. अभय आगरकर व किशोर बोरा यांचा समावेश आहे. तर शिवसेनेकडूनही  निवडणुकीत निर्णय घेण्याचे अधिकारी संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर, उपनेते अनिल राठोड व दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांना दिलेले आहेत. लोकसभेसाठी राज्य पातळीवर शिवसेना व भाजपात अजूनही ‘स्वबळा’चे नारे घुमत असल्यानं, महापालिका निवडणुकीतही भाजपाच्या खा. गांधी गटाला ‘स्वबळा’वर परिवर्तन करायचेय! पक्षात नव्यानं दाखल झालेल्या ‘आयारामां’च्या जीवावर जळगाव, सांगली महापालिकेप्रमाणं सत्ता काबिज करू शकतो, असं त्यांना वाटतयं. प्रत्यक्षात काही ठराविक अपवाद वगळला तर अनेक प्रभागांत भाजपाकडं प्रबळ उमेदवार नसल्याचं दिसून येतंय. शिवाय युती न झाल्यास मत विभागणीचा फायदा दोन्ही काँगे्रसला होऊ शकतो, हे माहीत असल्यानं भाजपाच्या दुसर्‍या गटाची मात्र शिवसेनेशी युती व्हावी, अशी इच्छा आहे. या अंतर्गत गटबाजीत इच्छुकांची मात्र चांगलीच कोंडी झालेली आहे. दुसरीकडं शिवसेनेनं ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर तयारी सुरू केलीय. बहुतांशी प्रभागात शिवसेनेनं उमेदवारांचे पॅनलही तयार केली असल्याचं सांगण्यात येतंय. सर्वच प्रभागांत उमेदवार देण्याच्या दृष्टीनं पक्षीय पातळीवर शिवसेनेकडून चाचपणी सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि.5) शिवसेनेकडून सर्व 17 प्रभागांतील निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत. 

भाजपाकडून मात्र अद्याप तशी कोणतीही तयारी सुरू झालेली नाही. सद्यस्थिती पाहता शिवसेना अन् भाजपाची युती होण्याबाबत काहीच हालचाली होताना दिसत नाहीयेत. अनेक प्रभागांत लंगड्या पॅनलमुळं त्यांना एकमेकांची गरज लागणार आहे. पण त्यामुळं युती होणार की दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार, हे लवकरच कळणार आहे. कारण आत घोडामैदान जवळ आलेलं आहे. मात्र, निवडणूक जाहीर झाल्यानंतरही अजूनतरी ‘आघाडीचं काय कळंना.. युतीचं काही जुळंना’, अशीच सध्याची परिस्थिती आहे.