Sat, Aug 15, 2020 13:12होमपेज › Ahamadnagar › कृषिकन्या रुग्णालयातही अन्नत्यागावर ठाम

कृषिकन्या रुग्णालयातही अन्नत्यागावर ठाम

Published On: Feb 09 2019 12:50AM | Last Updated: Feb 09 2019 12:38AM
पुणतांबा : वार्ताहर

गेल्या पाच दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी लेकीच्या अन्नत्याग आंदोलनास काल जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भेट देऊन चर्चा केली. मात्र, आंदोलन सोडविण्यासाठी त्यांनी केलेली शिष्टाई कृषी कन्यांनी धुडकावून लावली. दरम्यान, आंदोलनकर्त्या शुभांगी जाधव या मुलीची प्रकृती खालावल्याने तिला गुरुवारी रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथेही तिने अन्नत्याग सुरूच ठेवला आहे. दरम्यान, सरकारच्या निषेधार्थ काल किसान क्रांतीच्या वतीने पुणतांबा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. 

कर्जमुक्ती, कोरा सातबारा, स्वामीनाथन आयोग लागू करण्याच्या मागण्यांसाठी तीन शेतकरी लेकींचे सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. काल (दि.8) पाचव्या दिवशी पालकमंत्री शिंदे यांच्यासह आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्या निकिता जाधव, पूजा जाधव यांच्याशी चर्चा केली. यावेळी ना. शिंदे म्हणाले, कृषिकन्यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली असून, या मागण्यांबाबत

सरकारने यापूर्वीच कार्यवाही सुरू केलेली आहे. 22 हजार कोटी रूपये कर्जमाफी केली. मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करुन सकारात्मक निर्णय होईल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाबाबत चर्चेतून मार्ग काढला. त्यासाठी आपणही हे आंदोलन थांबवून संवादातून तोडगा काढू. यासाठी अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, निकिता जाधव हिने ही विनंती धुडकावली. माझा आश्‍वासनांवर विश्‍वास नसून,  प्रत्यक्षात कार्यवाही करण्याची तिने मागणी केली.

दरम्यान, सरकारच्या निषेधार्थ श्रीरामपूर, कोपरगाव, रस्त्यावरील आशा केंद्र चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सुहास वहाडणे, रवींद्र धोर्डे, महेश कुलकर्णी, भास्कर मोटकर, अण्णा बोरबने, दत्तात्रय गायकवाड, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, संभाजी गमे आदींनी आंदोलनाची तातडीने दखल घेण्यासाठी मंडलाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांना निवेदन दिले.

आंदोलनकर्त्या शुभांगी जाधव या मुलीची प्रकृती गुरूवारी सायंकाळनंतर खालावली होती. मात्र, मुलीने उपचार घेण्यास नकार दिल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. रात्री 1 वाजता जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या उपस्थितीत तिला नगर येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत रुग्णालयातही अन्नत्याग आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शुभांगी जाधव हिने दूरध्वनीवरून आंदोलनस्थळी सांगितले.

आंदोंलनास वाढता पाठिंबा मिळत असून, काल माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, खा. सदाशिव लोखंडे, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, छावा संघटनेचे संस्थापक किरण गायकवाड, प्रदेशाध्यक्ष विशाल पागरकर, विश्‍वनाथ वाघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दशरथ सावंत, प्रहारचे विनोद परदेशी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, श्रीरामपूर तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, पंडितराव चांदगुडे आदींनी भेट दिली. आंदोलनस्थळाला काल पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

किसान क्रांती राज्य सदस्यांची गैरहजरी

‘देता की जाता’ यासाठी 26 जानेवारीपासून किसान क्रांती राज्य समितीने ‘किसान जागर’ यात्रा सुरू केली असून, या आंदोलनास पाठिंबा म्हणून शेतकर्‍यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मात्र, काल आंदोलनाचा पाचवा दिवस असूनही राज्य समन्वयक समितीने आंदोलनास अद्याप भेट दिली नसल्याने त्याबाबत चर्चा होत आहे.
    
उद्धव ठाकरे यांची कृषिकन्येशी चर्चा

शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या निकिता जाधवशी मोबाईलवर संपर्क साधला. तुम्ही केलेल्या आंदोलनास माझा सलाम आहे. तुमच्या मागण्या रास्त असून, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तुम्हाला न्याय देण्यास भाग पाडू, असे आश्‍वासन ठाकरे यांनी दिले. खा. सदाशिव लोखंडे यांनी आंदोलन स्थळावरून ही चर्चा घडवून आणली.