Tue, Aug 04, 2020 11:09होमपेज › Ahamadnagar › जिल्ह्यात 529 रुग्ण कोरोनामुक्‍त

जिल्ह्यात 529 रुग्ण कोरोनामुक्‍त

Last Updated: Jul 12 2020 1:25AM

संग्रहित छायाचित्रनगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ज्या वेगाने वाढतेय, त्याच वेगाने कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचारार्थ दाखल झालेल्या कोरोना रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी आणि त्यांच्यावर  आवश्यक ते उपचार केल्याने या रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. हा दिलासाच त्यांना कोरोनावर मात करण्याचे बळ देऊ लागला आहे. शुक्रवारी 35 रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला. गेल्या चार महिन्यांत तब्बल 529 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन, आपापल्या घरी गेले आहेत.  

गेल्या चार साडेचार महिन्यांपासून कोरोना विषाणूने देशभरात काहूर सुक्षीं आहे. मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नगर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. नगरमध्ये पहिला रुग्ण आढळताच, भीतीचे वातावरण निर्माण झाले   होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तत्काळ सरकारी यंत्रणा सतर्क केली. कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. अशाही परिस्थितीत कोरोनाने नेवासा नंतर नगर, जामखेड पुन्हा नगर, संगमनेर आदी तालुक्यांत शिरकाव केला. 

पहिल्या कोरोनाबाधित रुग्णावर नगर शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार 14 दिवस उपचार केले. त्यानंतर हा कोरोनाबाधित ठणठणीत बरा होऊन बूथ हॉस्पिटलमधून सुखरुपपणे बाहेर पडला. पहिल्या रुग्णानंतर हळूहळू सर्वच रुग्ण कोरोनावर मात करीत बाहेर पडू लागले आहेत. 

बाळांपासून आजीबाईपर्यंत 

जिल्ह्यातील दहा महिन्यांच्या बाळापासून 90 वर्षांच्या आजीबाईपर्यत कोरोना विषाणू पोहोचला आहे. तरुणापासून वृध्दापर्यंत सर्वानाच कोरोनाने त्रस्त केले आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडताच जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महसूल, पोलिस आणि आरोग्य प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवाचे रान करीत बाधितांच्या संपर्कातील नातेवाईक, मित्र मंडळी यांना शोधून त्यांची चाचणी केली जात आहे.  

जिल्ह्यात 25 मेपर्यंत फक्‍त 75 कोरोनाबाधितांची नोंद होती. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यात आणि जिल्ह्यात जाण्यास मोकळीक दिली गेली. त्यामुळे मुंबई, पुणे व इतर परजिल्ह्यांतून जिल्ह्यात येणार्‍याची संख्या वाढली आणि कोरोनाबाधित खेड्यापाड्यांत सापडू लागले आहेत. 

12 मार्च ते 10 जुलै या चार महिन्यांत तब्बल 812 कोरोनाबाधित आढळले आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून या रुग्णांवर 24 तास उपचार केले जात आहेत. बूथ हॉस्पिटलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळत रुग्णांकडून योग करून घेतला जात आहे. औषधोपचार झाल्यानंतर या रुग्णाना विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध केली आहेत. शुक्रवारी (दि.10) 35 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नगर महापालिका क्षेत्रातील 13, संगमनेर येथील 14, कोपरगाव तालुक्यातील 3 व राहाता, शेवगाव, पाथर्डी,राहुरी, पारनेर, नेवासे आदी तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

कोरोना बाधित रुग्ण कोणत्याही परिस्थतीत बरा झालाच पाहिजे, असे निर्देश द्विवेदी आरोग्य यंत्रणेला वारंवार देत आहेत. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडेे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, तसेच जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटल येथील डॉक्टर, परिचारिका  आणि कर्मचारी 24 तास राबत आहेत. या सरकारी यंत्रणेच्या भरीव योगदानामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 65 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. 

तालुकानिहाय कोरोनामुक्‍त संख्या 

नगर महापालिका 199, संगमनेर 117, राहाता 39, जामखेड 20, नेवासे 7, कोपरगाव 10,पाथर्डी 9, पारनेर 17, श्रीरामपूर 16, श्रीगोंदे 13, कर्जत 10, अकोले 23, शेवगाव 13, राहुरी 9. नगर ग्रामीण 19.

तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या 

नगर महापालिका 286, संगमनेर 181,  राहाता 46, जामखेड 26, नेवासे 20, कोपरगाव 13, पाथर्डी 14, पारनेर 29, श्रीरामपूर 33, श्रीगोंदे 21, कर्जत 14, अकोले  32,  शेवगाव 23, राहुरी 6, नगर ग्रामीण 37.