Wed, May 19, 2021 05:39
अहमदनगर : आज रात्री १२ वाजल्यापासून १० मे पर्यंत कडक लॉकडाऊन

Last Updated: May 02 2021 10:23AM

संग्रहित छायाचित्र
अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा 

नगर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

आज रात्री १२ वाजल्यापासून ते १० मेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध सकाळी ७ ते ११ पर्यंत विक्री सुरू असेल. तसेच किराणा विक्री व भाजीपाला विक्री बंद राहणार आहे. तरी कृपा करून शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीस आणू नये अन्यथा मनपाच्यावतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे तसेच कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे पाहणी केली. 

पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांनी सांगितले की, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोणीही जॉगिंगसाठी बाहेर पडू नये. विनाकारण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.