Wed, Jun 23, 2021 01:31
ऑक्सिजन पातळी खालावल्यास काय करावे?

Last Updated: Jun 10 2021 11:05AM

डॉ. संजय गायकवाड

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांनी जीव गमावला आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्यंतरी आरोग्य मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली, तर प्रोनिंग केल्यास (पोटावर झोपणे) फायदा होऊ शकतो. 

डॉक्टरांनीही प्रोनिंग फायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या कोरोना रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यास प्रोनिंग करून प्राणवायूची पातळी पुन्हा पूर्ववत होऊ शकते.

तुम्हाला श्‍वसनाचा विकार असेल किंवा शरीरातील ऑक्सिजनचा स्तर 94 च्या खाली गेला, तर अशा स्थितीत प्रोनिंग फायदेशीर ठरू शकते. कृत्रिम ऑक्सिजन उपलब्ध होईपर्यंत प्रोनिंग करून रुग्णाचा जीव वाचवला जाऊ शकतो.

प्रोनिंग करण्यासाठी रुग्णाला पोटावर झोपवा. त्यानंतर रुग्णाच्या मानेखाली एक उशी द्या. तसेच त्याच्या पोटाखाली आणि मांड्यांच्या वरच्या भागाखाली एक किंवा दोन उशा ठेवा. अशा स्थितीत रुग्णाला सतत श्‍वास घ्यायला सांगा. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी पूर्ववत होण्यास मदत होईल. मात्र, 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ प्रोनिंग करू नये. जेवल्यानंतर लगेच प्रोनिंग करू नये. गर्भवती महिलांनी प्रोनिंगपासून पूर्णतः दूर राहावे. पोटावर झोपण्याच्या स्थितीमुळे वायुविजन सुधारते. फुफ्फुसांमधील लहान-लहान जागा उघडल्या जातात आणि श्‍वास घेणे सोपे होते. प्रोनिंग करताना आरामदायक वाटण्यासाठी उशांची स्थिती थोडी-फार बदलली जाऊ शकते. एखादी व्यक्‍ती एका दिवसांत सोळा तासांत वेगवेगळ्या चक्रांत आरामदायक वाटेल इतके प्रोनिंग करू शकते.