Wed, May 19, 2021 05:56
मूत्रपिंड बिघाडाचे संकेत

Last Updated: Apr 29 2021 2:44AM

डॉ. महेश बरामदे

किडनी म्हणजेच मूत्रपिंड शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. मूत्रपिंड शरीरातील रक्‍ताचे शुद्धीकरण करते. पाणी, अन्‍न, क्षार यांचे संतुलन, रक्‍तदाब, रक्‍तकण आणि कॅल्शियमवर नियंत्रण करण्याचे काम करते. मूत्रपिंड रक्तातील दूषित घटक गाळून स्वच्छ करते आणि रक्‍तातील अनावश्यक कचरा घटक मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकते आणि शरीराचे शुद्धीकरण करते. शरीराला हानीकारक असणारे युरिया, क्रिएटिनीन आणि इतर अनेक प्रकारची आम्ले या माध्यमातून बाहेर टाकली जातात. शरीरात नव्या लाल रक्‍तपेशी निर्माण करणार्‍या हार्मोन्सचे नियंत्रणही करते. 

शरीरात असणारे विषारी घटक रक्‍तामार्फत मूत्रपिंडात येते आणि त्यानंतर मूत्रपिंड त्याचे शुद्धीकरण करून हानीकारक घटक मूत्रावाटे शरीराबाहेर टाकते. किडनी शरीरातील काही बिघाडांचे संकेतही देत असते. 

पाणी शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. शरीरात दोन मूत्रपिंड असतात त्यामुळे एक मूत्रपिंड खराब झाले, तर व्यक्‍ती दुसर्‍या मूत्रपिंडाच्या सहाय्याने जगू शकते, तरीही मूत्रपिंड खराब होणे ही काही चांगली गोष्ट नाही. एका मूत्रपिंडावर व्यक्‍ती जगू शकत असली, तरीही काम करण्याची क्षमता ही पहिल्यापेक्षा निम्मी होते. व्यक्‍ती अशक्‍त होते. मूत्रपिंड खराब झाल्याची काही लक्षणे शरीर आपल्याला सांगते. काही गोष्टी लक्षात ठेवल्या, तर मूत्रपिंड खराब होत आहे, हे आधी लक्षात येऊ शकते. 

सूज आणि वाढते वजन : मूत्रपिंड खराब झाले, तर शरीरातील अतिरिक्‍त पाणी आणि मीठ शरीरातून बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे पाय, घोटे, हात आणि चेहरा सुजतो. त्याला इडिमा असे म्हणतात. मूत्रपिंड हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करत असते; पण जेव्हा मूत्रपिंडच खराब होते तेव्हा शरीरात टाकाऊ पदार्थ जमा होत राहतात. परिणामी, वजन वाढते.  लघवी कमी होणे ः सर्वसामान्य प्रमाणापेक्षा कमी लघवी होत असेल, तर मूत्रपिंडाचे काम बिघडले आहे, असे समजावे आणि तपासणी करून घ्यावी. 

थकवा : मूत्रपिंड हिमोग्लोबिनचे प्रमाणही संतुलित राखते; पण तेव्हा मूत्रपिंड खराब होते तेव्हा शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होेते आणि अ‍ॅनिमियाची समस्या निर्माण होते. त्यामुळे रक्‍ताची कमतरता असल्यास व्यक्‍तीला थकवा जाणवतो. 

भूक कमी लागते : शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंड करत असते. त्यामुळे जेव्हा मूत्रपिंडाचे काम योग्य प्रकारे होत नाही तोपर्यंत विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे भूक कमी लागते.

सतत थंडी वाजणे : मूत्रपिंड खराब झाल्यास अ‍ॅनिमिया किंवा रक्‍त कमी होते. त्यामुळे व्यक्‍तीला सतत थंडी वाजत राहते.