Sat, Feb 27, 2021 06:29
जाणून घ्या द्राक्षे खाण्याचे फायदे

Last Updated: Feb 23 2021 10:14AM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

थंडी लाली ओसरायला लागली की फळबाजारपेठेत द्राक्ष नजरेस पडू लागतात. द्राक्षांपासून बेदाणे बनतात. चविष्ट डिशेसमध्ये त्याचा वापर केला जातो. पण द्राक्षांचे काम केवळ इतकंच नाही. तर निसर्गाचा अनमोल खजिना समजली जाणारी गोड, आंबट द्राक्षे जितकी चविष्ट असतात तितकी आरोग्यदायीदेखील असतात. 

जीवनसत्व क 

जीवनसत्व 'क' हे आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्वांपैकी अतिमहत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. 'क' जीवनसत्वाची आपल्या शरीराला नियमित रूपाने गरज भासते. अँटीऑक्सीडेंटच्या रुपात आपली त्वचा उजळवण्यात आणि स्किन टाइटनिंगमध्ये जीवनसत्व 'क' महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून द्राक्षाचे नियमित सेवन हे करायला हवे, जेणेकरून आपल्या शरीराला नियमितपणे भासणारी जीवनसत्व 'क' ची मात्रा भरून निघेल. तर मंडळी जर तुम्ही कमी द्राक्ष खात असाल तर ती सवय बदला आणि जास्तीत जास्त द्राक्ष खा.

रक्तदाब कमी होतो

सध्याच्या धावपळीच्या युगात आपण सर्वजण तणावाखाली काम करत असतो. त्यामुळे हृदयाशीसंबंधी अनेक समस्या हळूहळू उद्भवू लागतात. या समस्यापासून बचाव करण्यासाठी द्राक्ष हे फळ खूप उपयुक्त ठरतात. द्राक्षांमध्ये पोटॅशियम पुरेशा प्रमाणात आढळते, जे रक्तदाब कमी करण्याचे आणि सामान्य ठेवण्याचे काम करते. त्यामुळे मंडळी तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून द्राक्ष खाल्ली पाहिजेत.

मधुमेहापासून बचाव

मधुमेहापासून सुरक्षित राहण्यासाठी देखील द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरते. द्राक्ष खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचा स्तर खूप कमी होतो. या सोबतच हे फळ शरीरातील रक्ताच्या साखरेची पातळी संतुलित ठेवण्याचेही काम करते. तुमच्या रक्तात जितकी साखर असेल तेवढा तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे मधुमेहापासून स्वत:च्या शरीराचा बचाव करायचा असेल तर तुम्ही द्राक्ष खायला हवीत. 

रक्ताची कमतरता 

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.