Sat, Feb 27, 2021 06:55
कोरोनाचा धोका अजूनही आहे !

Last Updated: Feb 18 2021 2:55AM

गेले वर्षभर कोरोनाने जगातल्या कानाकोपर्‍यात आपले अस्तित्व दाखवले, नव्हे आपल्या अस्तित्वाने सर्वांना सळो की पळो करून सोडले. गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपल्याकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती; पण गेल्या आठवड्यात ही संख्या हळूहळू वाढू लागली आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच आपल्याला वेळीच सावध व्हायला हवे.

साधारण जून-जुलैमध्ये आपल्याकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढली, तेव्हा त्या रुग्णांमध्ये विविध प्रकारची लक्षणे असायची. जसे की सर्दी, पडसे, घसा दुखणे, नाक गळणे, भरपूर ताप येणे, खोकला येणे, दम लागणे इत्यादी. एक-दोन दिवसांतच रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागायची. या काळात रुग्णांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायला लागायचे. ऑगस्टमध्ये तर केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात  कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. सर्व हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून गेली. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले. सप्टेंबरमध्ये ही स्थिती फारशी बदलली नाही. उलट रुग्णांची संख्या आणखी वाढली; पण ऑक्टोबरमध्ये हळूहळू रुग्णांची संख्या कमी झाली आणि कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण घटले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात कोरोनाच्या बाबतीत जनमानसात प्रचंड भीती निर्माण झाली आणि सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे, मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, अनोळखी ठिकाणी स्पर्श न करणे, स्पर्श केलाच तर साबणाने किंवा सॅनिटायझर वापरून  हात स्वच्छ करणे हे नियम कसोशीने पाळले गेले. याचा परिणाम म्हणून आपल्याकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. गेल्या तीन महिन्यांत आपल्याकडचे चित्र पालटले. कोरोनाची भीती कमी झाली; पण गेल्या आठवड्यात मुंबईत लोकल सुरू झाली. लोकांची रस्त्यावर गर्दी होतीच शिवाय समारंभांची संख्या वाढली. समारंभातील गर्दी वाढली. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी ये-जा वाढली. पूर्वी विनाकारण प्रवास करणे लोक टाळत होते; पण सुमारे वर्षभर लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेले काहीजण औटिंगसाठी बाहेर पडले. मंडई, बाजार, मॉल, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस-रेल्वे प्रवास, लग्न मंडप, हॉटेल्स अशा अनेक ठिकाणी पूर्वीसारखीच गर्दी दिसू लागली. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शाळा-महाविद्यालये सुद्धा सुरू झाली. आज लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी अजून आपल्यातून कोरोना हद्दपार झालेला नाही. अजूनही कोरोनाचे रुग्ण आजूबाजूला आहेत. त्यांची लक्षणे पूर्वीसारखी तीव्र नाहीत; पण रुग्ण आहेत, हे वास्तव टाळून चालणार नाही.

कोरडा खोकला, मध्यम ताप आणि दम लागणे - धाप लागणे ही लक्षणे आज तीव्रतेने आढळतात. तुमची सर्दी, तुमचा खोकला आणि तुमची धाप साध्या औषधोपचाराने कमी येत नसेल, तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तवाहिन्यांत गुठळ्या होणे आणि त्यामुळे विविध प्रकारची लक्षणे दिसणे विशेषतः अचानकपणे खूप धाप लागणे किंवा मेंदूशी संबंधित काही लक्षणे दिसणे हीसुद्धा  कोरोनाची लक्षणे असू शकतात. याकडे दुर्लक्ष व्हायला नको.

अशी लक्षणे आढळल्यानंतर जेव्हा रुग्णांना कोरोनाची चाचणी करून घ्यायला सांगितले जाते, तेव्हा काहीजण त्याला नकार देतात.‘मला कोरोना कसा होईल’, असा अनेकांचा समज असतो; पण कोरोना चाचणीला नकार देणे, हे जीवावर बेतू शकते. पूर्वी छातीचा एक्स-रे काढल्यानंतर कोरोनाची शक्यता त्यावरून वर्तवता यायची. आज-काल छातीच्या एक्स-रेवर पूर्वीसारखी कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आरटी-पीसीआर ही चाचणी कोरोनाचे निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

कोरोनापासून दूर राहायचे असेल, तर सावध राहा. विनाकारण प्रवास करू नका. गर्दीच्या वेळी बाहेर पडू नका. महत्त्वाची कामे करावयाची असतील तर, शक्यतो गर्दी नसताना बाहेर पडा. सहज म्हणून कोणाला भेटायला जाऊ नका. घराबाहेर पडताना  मास्कचा वापर करा. मास्क हा नाकावर बांधायचा असतो. केवळ तोंडावर नव्हे. अनेकजण मास्क तोंडावर ठेवतात आणि नाक मात्र उघडे असते. हे सर्वांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अशा वर्तणुकीमुळे कोरोना पसरू शकतो.  दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर असावे, हे अनेकजण बहुधा विसरलेले आहेत. तुमच्या तोंडावर मास्क नसेल  आणि समोरची व्यक्तीसुद्धा मास्कविरहित असेल, तर कोरोनाचा धोका वाढतो. शिंकणे, खोकणे अशा क्रियांमधून कोरोनाचा विषाणू बाहेर पडतो आणि तो समोरच्या व्यक्तीला त्रासदायक ठरतो, हे खरे आहेच; पण दोन व्यक्तींमध्ये केवळ तीन फुटांचे अंतर असेल आणि त्या व्यक्ती एकमेकांशी मोठ्याने बोलत असतील, तरीसुद्धा कोरोनाचा विषाणू एकमेकांमध्ये पसरतो, हे लक्षात घ्यावे.

आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो किंवा लग्नासारख्या समारंभात जातो किंवा गर्दीच्या ठिकाणी जातो, तेव्हा हा धोका संभवतो. तुम्ही कोणाशी गप्पा मारत असाल किंवा एखाद्या कार्यक्रमात असाल आणि तो कार्यक्रम किंवा समारंभ मोकळ्या मैदानात असेल, तर कोरोनाचा धोका कमी होतो. एखाद्या हॉलमध्ये किंवा बंद ठिकाणी कोरोना पसरण्याचा धोका वाढतो. 

जी गोष्ट मास्कची, तीच गोष्ट हात स्वच्छ ठेवण्याची. आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अनेक ठिकाणी आपल्या हाताचा स्पर्श होतो. शक्यतो अनोळख्या ठिकाणी स्पर्श करू नये. कारण, फोमाईटसमधून कोरोनाचा विषाणू पसरतो. अनोळख्या ठिकाणी स्पर्श करून आपला हात जर नाकाशी, तोंडाजवळ किंवा डोळ्यांजवळ गेला, तर कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरात शिरण्याची शक्यता असते. दोन डोळे, नाक आणि तोंड हा चेहर्‍यावरील टी आकाराचा भाग म्हणजे ‘नो टच एरिया’ असतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

कोरोना वाढत आहे. कोरोनाचा धोका आजही आहे. कोरोना विषाणू फुफ्फुसांवर आक्रमण करतो आणि श्वसनावर दीर्घकालीन परिणाम करतो, हे कृपया विसरू नका. मनावर ताबा ठेवा. कोरोनाच्या नियमांचे पालन करा आणि कोरोनापासून दूर राहा.

डॉ. अनिल मडके