Mon, Apr 12, 2021 02:57
घरीच राहा; पण फिट राहा...

Last Updated: Apr 07 2021 8:29PM

डॉ. तुषार राणे

अनेकांना सुरुवातीला वर्क फ्रॉम होम कल्चर अतिशय आवडले. मात्र, जसजसा काळ उलटत गेला, तसतसे हे काम कंटाळवाणेही वाटू लागले. घरबसल्या कामाने शारीरिक हालचाली कमी झाल्या असून लोकआणखी आळशी होत असल्याचे दिसून येतेय. अनेकांना घरबसल्या तणाव आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

स्नायूंमध्ये होणार्‍या वेदना : अयोग्य पद्धतीने बसणे, टेबल अथवा खुर्चीचा अभाव  आणि तासन्तास एकाच स्थितीत बसल्याने अनेकांना स्नायूंमध्ये वेदना होणे, पाठदुखी, कंबर दुखणे, हात-पायांचे दुखणे अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. हे टाळण्यासाठी सर्वात आधी योग्य पद्धतीने बसण्याची सवय लावा, तसेच पलंगावर बसून काम करू नका. योग्य आकार व उंचीची खुर्ची वापरा.

डोळ्यांवरील ताण : आपण सतत आपल्या लॅपटॉपवर किंवा संगणकावर काम करत आहात म्हणून आपल्याला डोळ्यांची समस्या जसे की अंधूक द़ृष्टी, डोळ्यांची जळजळ इतर समस्या उद्भवत आहेत.  

कानाचे आरोग्य : आपल्याला व्हिडीओ कॉल्सद्वारे किंवा फोन कॉलद्वारे ऑनलाईन मिटिंगमध्ये उपस्थित राहावे लागत असेल तर इअर फोनचा वापर करावा.  

तणाव : वर्क फ्रॉम होममुळे नैराश्य, तणाव, चिंता आणि दु:खाच्या भावना उद्भवू शकतात. जास्त तास काम केल्यामुळे थकवा देखील जाणवू शकतो.

वजन वाढणे : बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे, व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणा, हृदयरोग तसेच मधुमेहासारखा आजार बळावण्याची शक्यता असते.  

अपुरी झोप : व्यस्त वेळापत्रक आणि गॅजेट्सचा अतिवापर आरोग्यास हानिकारक ठरतो. अपुर्‍या झोपेमुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते तसेच मन एकाग्र करणे देखील कठीण होऊ शकते.

घरून काम करताना...

* न चुकता दररोज व्यायाम करा. आपण तणावमुक्त राहण्यासाठी आणि औदासिन्यापासून मुक्त होण्यासाठी एरोबिक्स, इमारतीच्या आवारात सायकल चालविणे, घरच्या घरी चालणे, योगा, प्राणायाम आणि मेडिटेशनसारखे पर्याय निवडू शकता.

* एकाकीपणा दूर करण्यासाठी, आपल्या कुटुंबातील आणि मित्रांबरोबर आपल्या भावनांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा.  

* संतुलित आहाराचे सेवन करा. फळे, भाज्या, शेंगदाणे, बिया, शेंगा, डाळी आणि संपूर्ण धान्ये खाण्याचा प्रयत्न करा. कार्बोनेटेड पेय, शर्करायुक्त पेय, अल्कोहोल किंवा जास्त प्रमाणात कॅफिन घेऊ नका. 
कामाच्या दर 20 मिनिटांनंतर ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा आणि 20 सेकंदपर्यंत आपल्यापासून 20 फूट अंतरावर असलेल्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा आणि मॉनिटरसाठी अँटी-ग्लेअर स्क्रीन वापरा आणि डोळ्यांचा कोरडेपणा टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजन करा.