डॉ. सायली मोदी
उन्हाळ्यात प्रचंड उकाड्याने अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागतात. त्यामुळे उन्हाच्या या कालावधीत तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळा ऋतूमध्ये शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित आहारात कोणत्या गोष्टीचा समावेश करावा. जेणेकरून आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल, याबद्दल जाणून घेऊ...
आयुर्वेदात, उन्हाळा हा ग्रीष्म ऋतू म्हणून ओळखला जातो. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाचे चांगले चटके बसतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते.
आयुर्वेदात असे म्हटले आहे की, उन्हाळ्याचा दिवसांत तापमानात वाढ होत असल्याने जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन करू नये. उष्णतेमुळे घामावाटे शरीरातील पाणी निघून जात असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते. म्हणून थंडपेयाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
उन्हाळ्याच्या हंगामाबद्दल सांगायचे तर या हंगामात एखाद्याचे पचन प्रत्यक्षात सर्वात कमी असते. शरीराला अति उष्णतेपासून बचाव करण्यासाठी, शरीर आपली अंतर्गत उष्णता खाली करते ज्याला आपण अग्नी म्हणतो. म्हणूनच भूक नैसर्गिकरीत्या कमी होते. त्यामुळे या उन्हाळ्यात हलक्या स्वरूपाचे अन्न खावेत. वातावरणात उष्णता अधिक असल्याने आंबट, खारट, मसालेदार आणि तेलकट खाद्यपदार्थ खाणे टाळावेत, असे आयुर्वेदात सांगण्यात आले आहे.
उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणते पदार्थ आणि फळे खावीत, याबद्दल आयुर्वेदात मार्गदर्शन करण्यात आले आहे.
1. आंबा - हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. आंब्याच्या सेवनामुळे दोष, वात, पित्त आणि कफ नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. पिकलेले आंबे शरीराची ऊर्जा वाढवतात.
2. सफरचंद - सफरचंद चवीला गोड आणि अतिशय थंड आहे. शरीरात जास्त उष्णता असणार्या लोकांनी दिवसातून एक सफरचंद नक्कीच खावेत. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत मिळते.
3. टरबूज - उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका संभवू शकतो. अशावेळी टरबूज सेवन केल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते आणि डिहायड्रेशनचा त्रास होत नाही.
4. मनुका - आयुर्वेदात मनुक्याला औषधी गुणधर्म आहे. सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय मनुका हे थंड असतात, त्यामुळे त्याच्या सेवनामुळे पचनशक्ती सुधारते.
फळांचा रस -
फळांचा रस आरोग्याच्या द़ृष्टीने अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा रस पितात. परंतु, उन्हाळ्यात कोणत्या फळांचा रस प्यावा, हे खालीलप्रमाणे सांगितले आहे.
कच्च्या कैरीचे पन्हे हे एक उत्तम ज्यूस आहे. उन्हाळ्यात याच्या सेवनामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो.
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी कोकम सरबत प्यावे.
उन्हाळ्यात आवळ्याचा ज्यूस पिणेही अतिशय फायदेशीर आहे. कारण, आवळ्यात व्हिटॅमिन सी जीवनसत्त्वांचा समावेश असतो.
कडुनिंबाचा ज्यूस प्यायला कडवत लागतो. परंतु, उष्णतेमुळे त्वचेची काळजी आणि संसर्गापासून वाचवण्यास यामुळे मदत मिळते.
डाळिंबाचा रस वात, पित्त आणि कफ या तिघांसाठी अतिशय गुणकारी आहे.
इतर खाद्यपदार्थ :
कोथिंबीर - कोंथिबीरमध्ये थंड गुणधर्म आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कोंथिबीरचे सेवन करावेत. थंड गुणधर्म असणारे पदार्थ सेवन केल्यास शरीराला थंडावा मिळू शकतो. या थंड गुणधर्माच्या पदार्थांमुळे उन्हाळ्यात होणारे आजार टाळता येऊ शकतात. याशिवाय कोंशिबीर खाल्ल्याने त्वचा निरोगी राखण्यास मदत मिळते.
सूप - सूप पचायला हलके असल्याने रात्रीच्या जेवणात सूप घेणे अतिशय उत्तम ठरू शकते.
भाज्या - तंदुरुस्त आणि वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली, भोपळा, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
तांदूळ - उन्हाळ्यात तांदूळचे सेवन करणे खूप चांगले आहे. यासाठी जेवणात अखंड तांदूळ, लाल तांदूळ किंवा बासमती तांदळाची खिचडी एक चमचा तूप सोबत हिरव्या भाज्या आणि मूगडाळदेखील निवडता येईल.
पेये - उष्णतेमुळे घामाघूम होत असल्याने अशावेळी नारळाचे पाणी, ताजे दही आणि ताकाचे सेवन करावेत. गायीच्या तुपाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्री झोपताना एक तास आधी दररोज कोमट दूध प्यावे.