लातूर : ८७ वर्षांपासून आंबुलगा येथे होतोय देशभक्तीपर दसरा महोत्सव | पुढारी

लातूर : ८७ वर्षांपासून आंबुलगा येथे होतोय देशभक्तीपर दसरा महोत्सव

शहाजी पवार : लातूर – निजामाच्या जोखड अन जुलमातून नागरिकांना मुक्त करुन भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व प्रदान करण्यात आर्य समाजाचे योगदान मोठे असून, या लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ निलंगा तालुक्यातील आंबुलग्यात विजयादशमी (दसरा) साजरी केली जाते. या निमित्त गावातून स्वातंत्र्य सैनिकांचा जयघोष करीत दसरा मैदानावर गावकरी पोहचतात अन तिथे देशभक्तीपर भजनात अख्खा गाव हरवून जातो.

अंबुलगा (बु.) येथील या दसरा महोत्सवाला देशभक्तीची किनार आहे. निजामाच्या जुलमामुळे हा महोत्सव सुरु झाला. याबाबत माहिती देताना  आर्यसमाज अंबुलगा (बु.) चे प्रधानाध्यक्ष ओमप्रकाश आर्य म्हणाले, हे गाव पूर्वी हैदराबाद संस्थानात होते. तिथे चारहजार रझाकाराची छावणी होती. रझाकार गावात धुडघूस घालायचे, स्त्रियांवर अत्याचार करायचे. या गावात आर्यसमाजी कार्यकर्ते होते तेथे त्यांचे कार्यालयही होते. स्वातंत्र्य चळवळीला गतीमान करण्याचा आर्य समाजाकरवी होत असलेला प्रयत्न देशाने अनुभवला होता. विश्वानेही पाहीला होता त्यास निजाम तरी कसा अपवाद ठरणार? त्याला या संघटनेचे बळ माहीती होते.

हे संघटन आपल्या संस्थानासाठी धोका ठरू शकतो हे तो जाणून होता. म्हणूनच रझाकारांची करडी नजर या गावावर होती. त्यांनी आर्यसमाजाचे कार्यालय जाळले. एका निष्पाप महिलेवर अत्याचार केले. यामुळे नागरीक संतापले अन त्यांनी रझाकाराला सहकार्य करणारा तेथील पाटलाच्या वाड्याला घेराव घातला. त्याला बाहेर पड्ण्यास मज्जाव केला. त्याची गुरेढोरेही त्यांनी वाड्याबाहेर येऊ दिली नाहीत. गावकऱ्याच्या या एकजुटीपुढे पाटलाला हार मानावी लागली.

आर्यसमाजाचे रझाकारांनी जाळलेले कार्यालय स्वखर्चातून बांधून देण्याचा शब्द त्याने गावकऱ्याला दिला व पाळला अन गावकरी काहीसे शांत झाले. या एकीने गावकऱ्यांत विश्वास वाढला अन त्यांनी हा एकोपा अधिक दृढ करण्यासाठी एकीने सीमोल्लंघन करुन दसरा सण साजरा करण्याचा संकल्प केला.१९३५ पासून तो सुरूही झाला. स्वातंत्र्य हाच या महोत्सवाचा ध्यास व श्वासही होता. या व्यासपीठावरुन चेतवलेली स्वातंत्र्याची मशाल अखंड धगधगीत ठेवण्याचे काम येथील आर्य समाजाने केले व भारतीय स्वातंत्र्याच्या महायज्ञात सांगतेची समिधा टाकूनच ही मशाल शांत झाल्याचे आर्य यांनी सांगितले.

असा हाेताे महोत्सव

दसऱ्या दिवशी गावातील आर्य समाज कार्यालयातील यज्ञाने या महोत्सवाची सुरुवात होते. त्यात स्वांतत्र्यसैनिकांसह गावकरीही सहभागी होतात. त्यानंतर गावातून मिरवणूक निघते व ती दसरा मैदानावर पोहचते. तिथे देशभक्तीपर भजन अन प्रमुख मान्यवरांचे देशभक्ती, व्यसनमुक्ती, समाजसेवा, चारित्र्यसंवर्धन आदी विषयांवर मागदर्शन होते. स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार केला जातो. देशभक्तीपर नारे देत या महोत्सवाची सांगता होते.

Back to top button