नवरात्री दुसरी माळ : ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात तुळजापुरात भाविकांची अलोट गर्दी | पुढारी

नवरात्री दुसरी माळ : 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात तुळजापुरात भाविकांची अलोट गर्दी

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’ या जयघोषात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तुळजाभवानी देवीचे सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून खाजगी वाहनाने खूप मोठ्या संख्येने दुसऱ्या दिवशी तुळजापूर शहरात भाविकांची गर्दी दिसून आली. याप्रसंगी पोलिसांची वाहनांची शिस्त लावण्यासाठी एकच तारांबळ उडाली.

सातारा, सांगली, सोलापूर, बिदर, भालकी, गुलबर्गा, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यासह कर्नाटक राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी तुळजापुरात आज येताना दिसली. तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाहनतळ खासगी वाहनांनी तुडुंब भरले होते. याशिवाय उस्मानाबाद रोडवरील वाहन तळ येथेही मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी दिसून आली. या वाहन तळापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी भाविकांना ऑटो रिक्षाची मदत घ्यावी लागत आहे. याशिवाय दर्शन घेण्यासाठी घाटशीळ मार्गाकडे या भाविकांना वळवावे लागत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने प्रवेश मार्ग निश्चीत केले आहेत.

तुळजा भवानी मंदिरातील दर्शन मंडपाचे चारही मजल्यावर मंगळवारी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. याशिवाय बाहेरून येणाऱ्या भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या भाविकांना शिस्तीमध्ये दर्शन रांगेत सोडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीचे सेक्युरिटी गार्ड प्रयत्नशील होते. अनेक वयस्कर भाविकांना खुर्चीच्या साह्याने मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन जाण्यात येत होते. भाविकांची वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने जलद गतीने दर्शन घालण्याच्या अनुषंगाने काही उपाययोजना केल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button