नवरात्रोत्सव विशेष : जिनं सागराला शांत केलं ती शितळामाता, जाणून घ्या पौराणिक कथा (Video) | पुढारी

नवरात्रोत्सव विशेष : जिनं सागराला शांत केलं ती शितळामाता, जाणून घ्या पौराणिक कथा (Video)

रेवदंडा : महेंद्र खैरे : चौल म्हणजे प्राचीन चंपावतीनगरी, प्राचीनकाळी चौलमध्ये ३६० मंदिरे असल्याचा उल्‍लेख सापडतो. त्यामुळे चौलला पौराणिक अन्यय साधारण महत्व असून येथील अनेक मंदिरे जागृत असल्याची महती आहे. संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस असलेले चौलचे शितळामाता मंदिर त्यापैकीच एक आहे. भक्‍तांना कौल देणारे जागृत देवस्थान म्हणून शितळामाता मंदिर आजही भाविकांचे श्रध्दास्थान आहे.

चौल या दक्षिणेकडील प्राचीन नगरीत चौलच्या आंबेपुरी पाखडीत हिरव्या गर्द नारळ पोफळीच्या छायेत शितळादेवीचे भव्य मंदिर आहे. अलिबागपासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या चौलनाका येथून आग्रावकडे जाणार्‍या रस्त्यामध्ये शितळामाता मंदिर आहे. चौलनाक्यापासून दीड ते दोन कि.मी. अंतरावर असलेल्या शितळादेवी मंदिरास जाण्यासाठी रिक्षाचा प्रवास करावा लागतो अथवा अलिबाग येथून थेट आग्राव एसटीने शितळादेवीच्य मंदिराकडे जाता येते.

पुर्वीची स्थिती लक्षात घेता हे मंदिर चौलच्या दक्षिण खाडीजवळ बांधले होते. परंतू, आता जवळपास खाडी भरून बरीच जमीन वाढली आहे. या देवतेवर आंग्रे घराण्याची दृढ श्रद्धा होती. आंग्रे काळातच १७५९ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे लिखीत मिळते. या मंदिराचा प्रथम जिर्णोद्धार इ.स. १५८ मध्ये बाबूभट उपाध्ये यांनी द्रव्य मिळवून केल्याची नोंद आहे. इ.स. १७६७ मध्ये विसावी सरसुभेदार यांनी ब्राम्हण भोजन घातले. १७८५ मध्ये एप्रिलच्या सुमारास राघोजी आंग्रे कुटुंबासह देवीच्या दर्शनाला आले होते. तर १७९२ च्या ऑक्टोबर महिन्यात मुलाबद्दलचा नवस फेडण्यासाठी आले होते. त्याप्रसंगी हत्‍ती, घोडे, सरंजाम, व काही लष्कर बरेच दिवस तळ ठोकून या ठिकाणी राहिले होते.

१८०५ मध्ये बाबूराव आंग्रे दर्शनाला आल्याचा उल्‍लेख असून दरवर्षी दसर्‍यांच्या दिवशी आंग्रे कुटुंब दर्शनाला न चुकता येई व देवीच्या रक्षकाचा मान देत असत. पुर्वीचे आंग्रे काळीन लाकडी व कौलारू मंदिर आता पाडून त्या वास्तूतील मुर्तीची जागा न बदलता ग्रामस्थांनी जिर्णोद्धार समिती नेमून २७ मार्च १९९० रोजी गुढी पाडव्याच्या मुर्हूतावर नवीन सिमेंट क्रॉकिटचे मंदिर बांधण्यास सुरूवात केली. मार्च १९९७ मध्ये रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड यांचे हस्ते जिणोद्धाराचे काम पुर्ण झाल्याने उद‍्धाटन करण्यात आले.
ही देवता महाराष्ट्रात नव्हे तर अन्य प्रांतातील अनेक कुटुंबाची कुलदैवत आहे. रविवार, मंगळवार, गुरूवात व शुक्रवार या दिवशी भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळते. तर मंगळवार व शुक्रवार या दिवशी भाविक मनातील इच्छा अथवा अडचणी या विषयी देवीचा कौल मागतात.

या मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला गुलमादेवी, खोकलादेवी व खरूजादेवीच्या मुर्ती आहेत. जर कोणाला गुलमा झाल्या असेल तर तो जाण्यासाठी गुलमादेवीला ओटी भरणे, कोणाला खोकला झाला असेल तो जाण्यासाठी तर खोकलादेवीची औटी भरणे, तर कोणाला खरूज झाली असेल तर ती जाण्यासाठी खरूज देवीची ओटी भरून शितळामातेचा आशिर्वाद मोठया श्रद्धा व भक्‍तीने भाविक घेतात, तर शितळामातेच्या मंदिराच्या समोरील पुष्करणीतील पाण्याने पाय धुवूनच मंदिरात प्रवेश घेण्याची प्रथा आहे. तसेच विविध रोग आदीची सुटका होण्यासाठी या पुष्करणीतील पवित्र पाण्याने आंघोळ करण्याची श्रद्धा भाविक अद्यापी ठेवून आहेत. या देवीच्य परिसरात असलेल्या गोळबादेवी व भरडादेवी या शितळामातेच्या उपदेतता असल्याचे सांगितले जाते.

सागर तिरावरील चंपावतीनगरीत देवीची उपासक असलेली सुंदर, सुशील, निर्मळ, उदार, धर्मशील, कोमल, मनाची चंपावती राणीचे राज्य होते. चंपावती नगराला समुद्राचा वेढा होता. समुद्राच्या लाटाने चंपावती नगरीची तटबंदी सारखी तुटून नुकसान होत असे. समुद्राचे पाणी येण्याचे संकट दरवर्षी येत होते. त्यामुळे राणी हतबल होऊन दुखी होई, चांपतवी राणीचा दिवसरात्र प्रजा व राज्य यांच्या चिंतेत जाई, महासागरापुढे काय करावे असा प्रश्‍न सातत्याने राणीच्या मनात निर्माण होई. बरेच दिवस लोटल्यावर राणीने एकांतात अनुष्ठानास आरंभ केला.

मौनव्रत पाळून देवीच्या उपासनेला सुरूवात केली असे नवरात्रीचे आठ दिवस गेले. राणीच्या उपासनेला यश आले. शितळामाता प्रत्यक्ष प्रकट होवून राणीला म्हणाली, चंपावती काय संकट आहे, सागरावर माझी सत्‍ता आहे. मला शितळामाता म्हणतात, त्यावर राणीने सागरापासून होणार्‍या त्रासाबद्दलची कहानी देवीला कथन केली. या सागराच्या संकटापासून नगरीचे रक्षण कर असे सांगताच देवीने क्षण ही न घालवता माझे शक्‍तीने सागराला शांत करेन असे म्हणत हातातील तुंबर सागरावर फेकला व सागर अडविला. सागर भयभीत होऊन शितळामातेस शरण आला व यापुढे या नगरीला कोणत्याही प्रकाराचा त्रास होणार नाही असे वचन सागराने देवीला दिले. शितळामातेस राज्य करण्यासाठी सिंहासनी बसवले. पुजापात्र घेऊन मातेची पुजा करून निर्मळ गंगाजळ, हळद कुंकू, आभुषणे, कनक, वस्त्र, श्रीफळ अर्पण केले. त्यापासून देवीचे स्थान या चंपावतीनगरीत निर्माण झाले. शितळादेवीचा दरबार देवदेवतेचे माहेरघर आहे. देवदेवता दर्शनासाठी येऊ लागल्या अशी पौराणिक कथासार आख्यायिका सांगितली जाते.

रत्नागिरी : साई रिसॉर्ट नवरात्रौत्सवात पाडणार : किरीट सोमय्या

या मंदिर परिसरात देवीची ओटी भरण्यासाठी साहित्य विक्री करण्यासाठी विक्रेते आहेत. तेथे नारळीपाक, चिक्‍की, तसेच बकुळीचे गजरे विक्रीस ठेवले जाते, यांची खरेदी करण्याची महिलांची गर्दी असते. चौलनाका ते शितळादेवी मदिरापर्यत अनेक घरगुती कॉटेज असून तेथे रहाण्याची व जेवण्याची सोय असते. भक्‍तांना कौल देणारे चौलचे शितळामातेचे जागृत देवस्थानास मुबई, पुणा, ठाणा तसेच रायगड जिल्ह्यातून असंख्या भाविक नित्याने भेट देत असतात.

हेही वाचलंत का? 

Back to top button