पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याने पॉलीग्राफ चाचणीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. रविवारी (दि.२५ ऑगस्ट) त्याची कारागृहातच पॉलीग्राफ चाचणी घेण्यात आली. या चाचणीत अनेक महत्त्वाचे तपशील उघड झाले आहेत. ( Kolkata rape-murder case)
'इंडिया टूडे'च्या रिपोर्टनुसार, संयज रॉय याने पॉलीग्राफ टेस्टवेळी सांगितले की, गुन्ह्याच्या रात्री त्याने शहरातील दोन रेड लाईट एरियामध्ये तो फिरुन आला. येथे त्याने लैंगिक संबंध ठेवले नाहीत. यावेळी त्याने रस्त्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याचे कबुली दिली. त्याचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेर्यात कैदही झाले आहे. त्याने त्याच्या एका मैत्रिणीसोबत व्हिडिओ कॉल केला. तिला तिचे न्यूड (नग्न) फोटो मागितले. तिने फाेटाे पाठवले.
८ ऑगस्ट २०२४ : कोलकातामधील आरजी कार हॉस्पिटलमध्ये पोलीस मित्र म्हणून काम करणारा संजय रॉय दाखल झाला. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचा मित्रही होता. मित्राच्या भावाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
रात्री ११ वाजून १५ मिनिट : संजय रॉय आणि त्याचा मित्र हॉस्पिटलमधून बाहेर पडले. त्यांनी दारु विकत घेवून रस्त्यावर मद्यप्राशन केले. दोघेही उत्तर कोलकातामधील सोनागाची रेड लाइट एरियात गेले. यानंतर दक्षिण कोलकातामधील चेतला या रेड लाइट एरियामध्ये गेले. यापूर्वी दोघांनी रस्त्यात एका मुलीचा विनयभंगही केला. चेतला रेड लाइट एरियात त्याच्या मित्राने एका महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवले. यावेळी रॉय बाहेर उभा राहून त्याच्या मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. रॉयने यावेळी त्याच्या मैत्रिणीला न्यूड (नग्न) फोटो मागितले. तिने नग्न फोटो संजय रॉय याला पाठवले. रॉय आणि त्यांचे मित्र रुग्णालयात परतले. संजय रॉय चौथ्या मजल्यावरील ट्रॉमा सेंटरमध्ये गेला.
पहाटे ४:०३ वाजता : संजय रॉय हॉस्पिटलमधील तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलजवळच्या कॉरिडॉरमध्ये जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. त्याने सेमिनार हॉलमध्ये प्रवेश केला, तिथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर झोपली होती. संजय रॉयने तिच्यावर हल्ला करत तिचा गळा दाबला. रॉयने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला, त्यानंतर तो घटनास्थळ पसार हाेत कोलकातामधील पोलीस अधिकारी मित्र अनुपम दत्ता याच्या घरी गेला.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, उल्लेख केलेल्या सर्व ठिकाणी रॉय आणि त्याच्या मित्राची उपस्थिती त्यांच्या कॉल डेटा रेकॉर्डद्वारे (सीडीआर) स्थापित करण्यात आली आहे. संजय रॉयच्या मोबाइल फोनवर मोठ्या प्रमाणात अश्लील क्लीपही अआढळल्या आहेत. यामध्ये त्याने स्वत:च्या लैंगिक कृत्यांचे चित्रण करणारे व्हिडिओचाही समावेश आहे.