पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान हा 'कॅन्सर' आहे, तो संपूर्ण मानवतेला झालेला 'कॅन्सर' आहे. त्याचा वेळची इलाज जगातील शक्तींना मिळून करावा लागेल, असे आवाहन करत जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णाची आठवण काढतो, तेव्हा त्याच्या एका हातात 'मुरली' आहे आणि दुसऱ्या हातात त्याच्याकडे 'सुदर्शन' आहे, फक्त 'मुरली'चा फायदा होणार नाही, सुरक्षेसाठीही 'सुदर्शन' आवश्यक आहे, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (दि.१६) पाकिस्तानवर तोफ डागली. त्रिपुरातील बरकथल येथील सिद्धेश्वरी मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्या, मथुरा आणि काशी हे सनातन हिंदू धर्माचे तीन महत्त्वाचे स्तंभ आणि मूल्य आहेत. जो आपल्या शत्रूंना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देतो, तो नेहमीच सुरक्षित असतो. फक्त 'मुरली'च पुरणार नाही, तर सुरक्षेसाठी 'सुदर्शन' देखील आवश्यक आहे.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला ते म्हणाले, काँग्रेसने स्वत:च्या स्वार्थासाठी देशाची फाळणी मान्य केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १९२५ मध्ये या धोक्याची जाणीव झाली होती. तेच खरे ठरले आणि देशाची फाळणी झाली. भारताच्या फाळणीला जे जबाबदार आहेत, त्यांच्याबद्दल योग्य माहिती देण्याची गरज आहे. पाकिस्तान हा कॅन्सर आहे आणि जोपर्यंत त्याच्यावर शस्त्रक्रिया होत नाही, तोपर्यंत या कॅन्सरपासून आपली सुटका होणार नाही. जोपर्यंत पाकिस्तान आहे. तोपर्यंत सामर्थ्यशाली देशांना एकत्र यावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
तुम्ही धर्माचे रक्षण केले तर धर्म तुमचे रक्षण करेल, पण तुम्ही त्याचा स्वार्थासाठी वापर केलात, तर तेच होईल. आम्ही सशक्त भारतासाठी काम करत आहोत, असेही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी नमूद केले.