नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी २४ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये पाच दिवस हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर होते. मात्र, अन्य प्रकरणांमुळे आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीपर्यंत पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे यावेळी तरी या प्रकरणावर सुनावणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादीसह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात या दोन्ही आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी एकाच वेळी घ्यायची, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. त्यानुसार गेले काही दिवस दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या तारखा एकत्र पडत आहेत. मात्र यावर सुनावणी होऊ शकलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाला आधी ऑक्टोबर महिन्यातील तारीख देण्यात आली होती. मात्र एका आठवड्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्येच तारीख देण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पाच दिवस हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर होते.
शिवसेना ठाकरे गटाला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला या प्रकरणावर लवकर सुनावणी हवी असल्यास असल्यास हे प्रकरण का महत्त्वाचे आहे याचे कारण देत न्यायालयासमोर हे प्रकरण नमूद करावे लागेल, मात्र त्यादृष्टीने शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पावले उचलण्यात आले नाहीत. पुढच्या काही काळात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार का, याबद्दल आता राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क सुरू झाले आहेत.