पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा देशभरात निषेध सुरु आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) हाही कोलकाता येथील कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. सौरव गांगुली, त्याची पत्नी डोना गांगुली पीडितेला न्याय देण्याची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
सौरवने नुकतेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याचे प्रोफाइल चित्र काळ्या रंगात बदलले आहे. सोशल मीडियावरील हजारो वापरकर्त्यांनी कोलकातामधील डॉक्टरवरील अत्याचार प्रकरणाचा हा निषेध असल्याचे म्हटलं आहे.
“कोलकाता येथील घटनेचा विचार करता सर्वकाही किंवा प्रत्येकजण सुरक्षित नाही, असा विचार करण्यास जागा नाही. असे अपघात जगभर घडतात. मुली सुरक्षित नाहीत हा विचार चुकीचा आहे. केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर भारतात सर्वत्र महिला सुरक्षित आहेत. आपण जिथे राहतो ते सर्वोत्तम ठिकाण आहे. एखाद्या घटनेवरुन न्याय करू नये, असे गांगुली म्हणाला होता. त्याच्या यासाठी त्याला नंतर स्पष्टीकरण देणे भाग पडले. तो म्हणाला होता की, “गेल्या रविवारी मी जे बोललो त्याचा अर्थ कसा लावला हे मला माहीत नाही. (गुन्हा) ही एक भयंकर गोष्ट आहे हे मी पूर्वीही सांगितले आहे. आता सीबीआय (आणि) पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जे घडले ते अतिशय लज्जास्पद आहे. तपास यंत्रणांनी दोषी शोधल्यानंतर त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, जेणेकरून भविष्यात असे गुन्हे करण्याचे धाडस कोणी करू नये, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. या प्रकरणी मंगळवा, २० ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. डॉक्टर आणि महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचे रक्षण करणे हा राष्ट्रीय हिताचा विषय आहे. देश काही पावले उचलण्यासाठी दुसऱ्या बलात्काराची वाट पाहू शकत नाही. वैद्यकीय व्यावसायिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात कायदे आहे; परंतु ते या समस्या सोडवत नाहीत, प्राचार्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अन्य कोणत्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कशी काय नियुक्त केली गेली? या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही. पीडितेचा मृतदेह उशिरा तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला; पोलीस काय करत होते?, असे सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारची झाडाझडती घेतली होती.