पुढारी ऑनलाईन डेस्क: बांग्लादेश मधील आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार पेटला आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Bangladesh PM Sheikh Hasina resigns) दिला. दरम्यान शेख हसीना सोमवारी दुपारी २.३० वाजता बंगभवन येथून लष्कराच्या हेलिकॉप्टरने भारतात रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातील सीमेवर भारतीय सुरक्षा दलाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बीएसएफचे डीजीही कोलकता येथे पोहोचले आहेत, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
"पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशात अंतरिम सरकार देश चालवणार आहे." अशी पुष्टी बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी केली असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या दलातील काही सदस्य सी-१३० विमानाने भारताच्या दिशेने आगेकूच करत असल्याची माहिती नुकतिच सुत्रांनी दिली आहे. हसीना आणि त्यांच्या सदस्यांचे विमान बांगलादेश-भारत धावपट्टीवर सायंकाळी ५ ते ५.१५ वाजता पोहोचण्याची शक्यता आहे.
बांगलादेश हवाई दलाचे विमान पटना ओलांडून यूपी-बिहार सीमेजवळ पोहोचले आहे. तसेच पुढे ते दिल्लीच्या दिशेने जात आहे, असे देखील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. उच्च सुरक्षा अधिकारी या विमान आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सर्व रडार सक्रिय आहेत आणि त्यावर बारीक नजर ठेवण्यात आली आहे, असे देखील सूत्रांनी सांगितले आहे.